मुंबई : मुंबई विमानतळावर डीआरआयतर्फे आज मोठी कारवाई करत जवळपास 3360 ग्राम कोकेन ड्रग जप्त करण्यात आलं आहे. जप्त केलेल्या कोकेनची आंतराष्ट्रीय मार्केटमध्ये किंमत जवळपास 33.60 कोटी इतकी आहे. हे ड्रग साबणाच्या बॉक्समध्ये लपवून तस्करी करण्यात येत होती. मात्र डीआरआय टीमने तस्करीचं हे मोठे रॅकेट उध्वस्त केलं आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत. सदर आरोपी एडिस अबाबा येथून आला होता. आरोपीकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
एडिस अबाबावरून मुंबईत येणारा एक भारतीय नागरिक ड्रग घेऊन येत असल्याची माहिती मुंबई डीआरआयला गुप्त सूत्रांकडून मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, डीआरआयच्या टीमने सापळा रचला होता.
मुंबई विमानतळावर एडिस अबाबावरून इथोपियन एअरलाइन्सची फ्लाईट जेव्हा मुंबई विमानतळावर पोहोचली, तेव्हा अधिकाऱ्यांना एका व्यक्तीवर संशय आला आणि त्याची चौकशी करण्यात आली.
डीआरआय अधिकारी यांनी जेव्हा त्याची कसून चौकशी केली, तेव्हा त्या व्यक्तीकडून अधिकाऱ्यांना जवळपास 16 साबणाचे बॉक्स मिळाले. तपास अधिकाऱ्यांनी जेव्हा ते बॉक्स उघडून पाहिले तेव्हा त्यामध्ये पावडरसदृश्य पदार्थ आढळून आला.
या पदार्थाची तपासणी केली असता तो पदार्थ कोकेन ड्रग असल्याचे निष्पन्न झाले. हे ड्रग साबणाच्या बॉक्समध्ये लपवून परदेशातून आणले होते. या प्रकरणात तस्करीचा माध्यमातून मुंबईत ड्रग घेऊन येणाऱ्या भारतीय नागरिकाला अटक करण्यात आली आहे.
या गुन्ह्यात आरोपी एकटाच आहे की यात आणखी कुणाचा सहभाग आहे?, तसेच आरोपी हे ड्रग कुणाकडे पार्सल करणार होता याचा पोलीस तपास करत आहेत.