ड्रग्ज पेडलर एमडी घेऊन उल्हासनगरात आला, पोलिसांना खबर लागली, शांतीनगरच्या वेलकम गेटजवळच अटकेचा थरार
राज्यात क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण गाजत असतानाच उल्हासनगरमध्ये पोलिसांनी एमडी ड्रग विकण्यासाठी आलेल्या ड्रग्ज पेडलरला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून विक्रीसाठी बाळगलेलं 8 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलंय.
उल्हासनगर (ठाणे) : राज्यात क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण गाजत असतानाच उल्हासनगरमध्ये पोलिसांनी एमडी ड्रग्ज विकण्यासाठी आलेल्या ड्रग्ज पेडलरला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून विक्रीसाठी बाळगलेलं 8 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलंय. विशेष म्हणजे मुंबईत ड्रग्ज पेडलर्स विरोधात कठोर कारवाई सुरु असताना उल्हासनगरात ड्रग्जची तस्करी केली जात आहे. त्यामुळे आरोपी ड्रग्ज पेडलर्सला पोलिसांची अजिबात भीती राहिलेली नाही हे निदर्शनास येतंय.
नेमकं प्रकरण काय?
उल्हासनगर शहरात ड्रग्जची विक्री होणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपायुक्तांच्या विशेष पथकाने शुक्रवारी उल्हासनगरच्या शांतीनगर वेलकम गेटजवळ सापळा रचला. यावेळी संशयित ड्रग्ज पेडलर दिसताच त्याच्यावर झडप घालत पोलिसांनी त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्या ताब्यात विक्रीसाठी आणलेलं 8 ग्रॅम एमडी, म्हणजेच मेफेड्रोन पावडर हे ड्रग्ज आढळून आलं.
आरोपीवर कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल
चंद्रहास शेट्टी उर्फ इमू असं या ड्रग्ज पेडलरचं नाव असून त्याच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात एनडीडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आलीय. त्याला आज उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, चंद्रहास शेट्टी याच्यावर यापूर्वीही ड्रग्ज विक्रीप्रकरणी कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली आहे.
सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर ड्रग्जखोरांविरोधात कारवाई कडक
अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्जचा मुद्दा समोर आल्यानंतर एनसीबीकडून या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला होता. या प्रकरणी तपास करत असताना एनसीबीच्या हाती महत्त्वपूर्ण माहिती लागली होती. त्याच माहितीच्या आधारावर एनसीबीने अनेक ड्रग्ज माफियांविरोधात कारवाई केली होती. एनसीबीने अनेक ड्रग्जखोरांच्या मुसक्या आवळल्या होत्या. याशिवाय या कारवाईत बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनही समोर आलं होती. एनसीबीने त्यानंतर अनेक कलाकारांची दोखील चौकशी केली होती. एनसीबीने नुकतीच क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला बेड्या ठोकल्या होत्या. पण या कारवाईवर संशय व्यक्त करण्यात आला होता. एनसीबी शिवाय पोलिसांकडूनही ड्रग्ज प्रकरणी अनेक मोठमोठ्या कारवाई करण्यात आल्या.
हेही वाचा :
याला बाप म्हणावं की सैतान, पोटच्या नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, डोंबिवलीत काय चाललंय?
आर्थिक वादातून महिलेची हत्या करुन आत्महत्येचा बनाव, हत्येपूर्वी सुसाईड नोटही लिहून घेतली