ते मध्यरात्री दोन वाजता मद्यधुंद अवस्थेत आले, 10 ते 12 वाहनांची तोडफोड, कल्याणमध्ये दहशत माजवणाऱ्यांचा सुळसुळाट
कल्याण डोंबिवलीत हल्ली गुन्हेगारीच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. कधी चैन स्नॅचिंग होते, तर कधी गाड्या सर्रासपणे चोरीला जात आहेत. पण पोलिसांची कारवाई हवी तशी होताना दिसत नाही.
कल्याण (ठाणे) : कल्याण डोंबिवलीत हल्ली गुन्हेगारीच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. कधी चैन स्नॅचिंग होते, तर कधी गाड्या सर्रासपणे चोरीला जात आहेत. पण पोलिसांची कारवाई हवी तशी होताना दिसत नाही. विशेष म्हणजे आता तर भयानक घटना समोर आली आहे. कल्याण पूर्वेच्या चिकणीपाडा परिसरात काही तरुण मध्यरात्री एका तरुणाला मारहाण करण्यासाठी आले होते. यावेळी त्या तरुणांना संबंधित तरुण सापडला नाही. त्यामुळे त्यांनी मध्यरात्री परिसरात धुमाकूळ घातला. त्यांनी परिसरातील वाहनांची तोडफोड केली. सततच्या होणाऱ्या या त्रासामुळे आता सर्वसामान्य नागरीक देखील हतबल झाले आहेत. याशिवाय नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेमकं काय घडलं?
संबंधित घटना ही रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली. कल्याण पूर्वेतील चिकणीपाड्यात दोन तरुण मद्यधुंद अवस्थेत आले. हे दोघे एका तरुणाच्या शोधात होते. तो सापडला नाही. या दोघांनी दारुच्या नशेत दहशत माजवण्यासाठी परिसरात उभ्या असलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांना निशाणा केला. त्यांनी बाईक, कार, रिक्षांची तोडफोड केली. तसेच एका तरुणाला जखमी केले.
संबंधित घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. घटनेनंतर गुरुवारी (26 ऑगस्ट) सकाळी काही नागरिकांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी घटनेची नोंद करुन तपासाला सुरुवात केली आहे. मध्यरात्री दहशत माजवणारे दोघे कोण होते? याचा शोध पोलीस घेत आहेत.
वाहनांची नुकसान भरपाई कोण देईल? नागरिकांचा सवाल
दरम्यान, या घटनेच्या प्रत्यक्षदर्शी अल्पवयीन मुलाने आपला अनुभव सांगितला. दोघेजण अतिशय जोरजोरात ओरडत शिवीगाळ करत होते. त्यांनी एका तरुणाचं नाव आपल्याला विचारलं. पण आपल्याला माहिती नसल्याचं सांगितलं. त्यानंतर आपण तिथून पळून गेलो. पण आरोपींनी आपला राग थेट परिसरातील वाहनांवर काढला. त्यांनी गाड्यांच्या काचा फोडल्या. प्रचंड नासधुस केली, अशी प्रतिक्रिया त्या मुलाने दिली. या घटनेत ज्या वाहनांचं नुकसान झालंय. त्याची नुकसान भरपाई नेमकं कोण देईल? असाही प्रश्न आता परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जातोय.
हेही वाचा :
रस्त्यावर चालताना मोबाईल घेऊन पळायचे, औरंगाबादेत दोन अट्टल चोरांना बेड्या