मोठी बातमी ! अनिल देशमुखांच्या अडचणीत आणखी वाढ, सुप्रीम कोर्टाकडून दिलासा न मिळाल्यानंतर ईडी पुन्हा कामाला
माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स पाठवले आहेत.
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स पाठवले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप केले आहेत. याच पार्श्वभूमीवर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने हे समन्स पाठवले आहे. विशेष म्हणजे ईडीने देशमुख यांना यापूर्वी तीनवेळा समन्स पाठवले आहेत. गेल्यावेळी अनिल देशमुख यांनी प्रकृतीचं कारण देत ईडी चौकशी टाळली होती. मात्र, आता पुन्हा एकदा ईडीने देशमुख यांना समन्स पाठवले आहेत. या समन्सनुसार देशमुख यांना 2 ऑगस्टला ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखव व्हावं लागेल.
सुप्रीम कोर्टाकडून देशमुखांना दिलासा नाही
अनिल देशमुख यांनी ईडीकडून अटक होऊ नये यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज (30 जुलै) कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीवेळी देशमुख यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाने अनिल देशमुखांची ईडीने अटक करु नये ही मागणी देखील मान्य केलेली नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 3 ऑगस्टला होणार आहे.
देशमुखांना तीन वेळा, तर पत्नी आणि मुलाला एक वेळा समन्स
दरम्यान सुप्रीम कोर्टाकडून दिलासा न मिळाल्यानंतर आता ईडीने आपली कारवाई सुरु केली आहे. ईडीने देशमुखांना 2 ऑगस्टला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावले आहेत. ईडीने देशमुखांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांनाही समन्स बजावले आहेत. ईडीने याआधी ऋषिकेश यांना एक वेळा तर अनिल देशमुख यांना तीन वेळा समन्स बजावले आहेत. तसेच अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांनाही समन्स बजावण्यात आले होते. पण आरती यांच्या वकिलांनी ईडी कोर्टात कागदपत्रे दाखल केले होते. त्यामुळे आता अनिल देशमुख आणि ऋषिकेश देशमुख यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vaze) यांना प्रतिमहिना 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश दिले होते, असा आरोप करणारे पत्र मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिले होते. देशमुख किंवा त्यांच्या कार्यालयातील कोणत्याही अधिकाऱ्याकडून कोणतेही गैरवर्तन किंवा गुन्हा झाल्याबाबत तपास सुरु आहे.
हेही वाचा :
ठाकरे सरकार हादरवण्यासाठी अनिल देशमुखांवरील FIR मध्ये ‘ते’ मुद्दे, हायकोर्टात CBI चा प्रतिदावा काय?
‘राजकीय हेतू पोटी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचं काम सुरु’, अनिल देशमुखांचा गंभीर आरोप