ईडी मुंबईच्या झवेरी बाजारात धडकली; कारवाईत सोन्या-चांदीचा ‘एवढा’ ऐवज जप्त
ईडीने यापूर्वी मेसर्स पारेख अल्युमिनेक्स लिमिटेडविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. या कंपनीवर बँकांची फसवणूक करून 2296.58 कोटींचे कर्ज घेतल्याचा आरोप आहे.
मुंबई : अनेक राज्यांत छापेमारीचा धडाका लावणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज मुंबईच्या झवेरी बाजारा (Zaveri Bazaar) त धडाधड धाडी (Raid) टाकल्या. या बाजारात वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून तब्बल 91.5 किलो सोने (Gold) आणि 152 किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. तसेच मेसर्स रक्षा बुलियनच्या आवारातून अतिरिक्त 188 किलो चांदीही जप्त करण्यात आली आहे. एकूण 47.76 कोटी रुपयांचे घबाड ईडीच्या हाती लागले आहे.
ईडीने यापूर्वी मेसर्स पारेख अल्युमिनेक्स लिमिटेडविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. या कंपनीवर बँकांची फसवणूक करून 2296.58 कोटींचे कर्ज घेतल्याचा आरोप आहे.
या आरोपाच्या चौकशीदरम्यान ईडीने आज मोठी कारवाई करीत झवेरी बाजारातील व्यापाऱ्यांचे धाबे दणाणून टाकले.
ना केवायसी, ना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच!
झडतीदरम्यान मेसर्स रक्षा बुलियनच्या आवारात खाजगी लॉकरच्या चाव्या सापडल्या. त्या आधारे खासगी लॉकर्सची झडती घेतली असता नियम न पाळता लॉकर्स चालवले जात असल्याचे आढळून आले.
यासाठी आवश्यक केवायसीचे पालन केलेले नाही. तसेच लॉकर्सच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले नाहीत. त्याचबरोबर आत-बाहेरचे रजिस्टर नव्हते.
लॉकर परिसराची झडती घेण्यात आली, त्यावेळी तेथे 761 लॉकर्स असल्याचे आढळून आले. त्यापैकी 3 मेसर्स रक्षा बुलियनचे आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा ईडीकडून कसून तपास केला जात आहे.
विविध कंपन्यांच्या माध्यमातून लेअरिंग करून काढले पैसे
कथित आर्थिक अफरातफरमधील पैसे विविध कंपन्यांच्या माध्यमातून लेअरिंग करून काढण्यात आले होते. हे पैसे असुरक्षित कर्ज आणि गुंतवणुकीसाठी वेगवेगळ्या खात्यांवर पाठवण्यात आले होते, अशी माहिती ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. अधिक चौकशीतून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सराफा व्यावसायिकांच्या जगतात मोठा हादरा
पारेख अल्युमिनेक्स लिमिटेड विरुद्ध मनी लाँड्रिंगचा खटला मार्च 2018 चा आहे. या प्रकरणात यापूर्वी 2019 मध्ये 205 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. 25 जून 2019 रोजी तात्पुरत्या स्वरूपात 46.97 कोटी रुपयांची तसेच 11 सप्टेंबर 2019 रोजी 158.26 कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच आणण्यात आली होती. त्यानंतर तीन वर्षानंतर पुन्हा मोठी कारवाई करून ईडीने सराफा व्यावसायिकांच्या विश्वात हादरा दिला आहे.