धक्कादायक! आधी औषधाचा ओव्हरडोस, मग अपहरणाचा बनाव, 5 महिन्याच्या बाळाला आईनंच संपवलं
सखोल चौकशी करत असताना चिमुकल्याच्या आईच्या संशयास्पद हालचाली आणि हावभाव बघून पोलिसांचा संशय बळावला होता. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी तपासाची सूत्र हलवली.
ठाणे : ठाण्यातील कळवा (Thane, Kalwa) परिसरातून एक धक्कादायक आणि हृदय हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. एका पाच वर्षांच्या चिमुकल्याच्या त्याच्या आईनंच खून (Murder) केला असल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी (Thane Police) संशयित आरोपील असलेल्या आईला अटक (Arrest) केली असून अधिक तपास सुरु आहे.
नेमका काय प्रकार?
ही धक्कादायक घटना समोर आली आहे ठाण्यातील कळवा परिसरात असलेल्या महात्मा फुले नगरमध्ये. पाण्याच्या प्लास्टिक ड्रममध्ये एक पाच महिन्याचं चिमुकलं बाळ आढळून आलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. याबाबत पोलिसांनी अधिक तपास केला. त्यानंतर समोर आलेल्या माहितीतून पोलिसांनी चिमुकल्याच्या आईलाच अटक केली आहे.
घटनाक्रम काय?
आपल्या पाच महिन्याच्या मुलाचं घरातून कोणीतरी अपहरण केल्याची तक्रार 24 डिसेंबरला पोलिस स्थानकात देण्यात आली होती. शांताबाई शंकर चव्हाण यांनी कळवा पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरुन तपासाला सुरुवात केली.
यादरम्यान पोलिसांना 25 तारखेला सकाळी आठच्या सुमारास घराच्या शेजारी असलेल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या ड्रममध्ये मुलाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी या बालकाचा मृतदेह शव विच्छेदनासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवला. तसंच पोलिसांनी आपली तपासाची यंत्र फिरवली आणि 24 तासाच्या आत बाळाच्या आईनेच त्या बाळाला पाण्याच्या ड्रममध्ये टाकल्याचं समोर आलंय.
तक्रार देणारा गुन्हेगार निघाला!
25 तारखेला सकाळी बाळाचा मृतदेह सापडल्यानंतर पोलीसही चक्रावून गेले होते. कोणीतरी अज्ञात इसमाने अपहरण करून त्याला जीवे मारलं आणि पुरावे नष्ट करण्यासाठी घराजवळ असलेल्या पाण्याच्या ड्रममध्ये टाकलं असावं, असा अंदाज बांधत पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती.
परंतु कुठलेही तांत्रिक पुरावे नसल्यानं पोलिसांसमोर एक मोठं आव्हान उभं राहिलं होतं. सखोल चौकशी करत असताना चिमुकल्याच्या आईच्या संशयास्पद हालचाली आणि हावभाव बघून पोलिसांचा संशय बळावला होता. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी तपासाची सूत्र हलवली. पोलिसांनी आईचीच कसून चौकशी केली.
अखेर चौकशीदरम्यान बाळाच्या आईने स्वतः बाळाला खोकल्याचे औषध दिल्याचं कबूल केलं. या खोकल्याच्या औषधाचा ओव्हर डोस झाल्यामुळे बाळाची प्रकृती गंभीर झाली होती आणि बाळ कुठलीही हालचाल करत नसल्यामुळे घाबरलेल्या आईनं आपल्याच बाळाच्या अपहरण बनाव रचला. त्यानंतर मृतदेह कुठे तरी लपवून ठेवला, तर कोणाला संशय येणार नाही, या विचारानं रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत तिनं बाळाचा मृतदेह घराच्या शेजारी असलेल्या पाण्याचा पिंपात टाकला, अशी कबुली पोलिसांनी दिली.
मृत्यू नेमका कशामुळे?
या बालकाचा मृत्यू नेमका औषधाच्या ओवर डोसमुळे झाला की पाण्यात बुडून झाला, याचा आता शोध घेतला जातो. त्यासाठी चिमुकल्याचा मृतदेह आता शवविच्छेदनासाठी पाठवला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली आहे.