सुपारी, मर्डर सारख्या गंभीर गुन्ह्यांचा आरोपी, चाहत्यांकडून केडीएमटी बस स्टॉपवर वाढदिवसाचा बॅनर
कुख्यात गुंड नन्नू शहाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी शहरात ठिकठिकाणी बॅनर लावले आहेत.
कल्याण (ठाणे) : कुख्यात गुंड नन्नू शहाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी शहरात ठिकठिकाणी बॅनर लावले आहेत. विशेष म्हणजे केडीएमटीच्या बस स्टॉपवर हा बॅनर लावण्यात आला आहे. आता या बॅनरवर कारवाई करण्यावरुन केडीएमसी अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी सुरु आहे. उपायुक्त सांगतात परिवहन कारवाई करणार, परिवहन अधिकारी सांगतो प्रभाग अधिकारी कारवाई करणार. त्यामुळे या भाईची दहशत केडीएमसी अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नेमकं प्रकरण काय?
कल्याण डोंबिवलीत अनेक वादग्रस्त बॅनर लावले जातात. केडीएमसीकडून अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केल्याचं अद्याप तरी समोर आलेलं नाही. शहराचे विद्रुपीकरण करण्यात बॅनरबाजीचा मोठा वाटा आहे. सध्या कल्याण शहरात एका भाईचा वाढदिवसाचा बॅनर खूप झळकतोय. हा भाई कुख्यात गँगस्टार धर्मेश उर्फ नन्नू शहा आहे.
नन्नू सध्या जेलमध्ये
नन्नू शहाच्या विरोधात देशभरात पंधरा गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर सुपारी, मर्डर, हत्येचा प्रयत्न, अपहरण, खंडणी यांसारख्या गुन्ह्यांचा आरोप आहे. नन्नू याने काही दिवसांपूर्वीच त्याचा मित्र मटका किंग जिग्नेश ठक्कर याची गोळ्या झाडून हत्या केली होती. सध्या याच प्रकरणात नन्नू जेलमध्ये आहे. त्याचा आज वाढदिवस आहे. त्याच्या चाहत्याने शहरभरात ठिकठिकाणी बॅनर लावला आहे.
कारवाई करण्यास प्रशासनाची कुचराई
विशेष म्हणजे सुप्रसिद्ध बिर्ला कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळील केडीएमटीच्या बस स्टॉपवर हा बॅनर लावण्यात आला आहे. अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या बॅनर प्रकरणी केडीएमसीचे उपायुक्त पल्लवी भागवत यांच्याकडे विचारणा केली असताना त्यांनी याबाबतची कारवाई केडीएमटी करणार, असं सांगितलं. तर केडीएमटीचे व्यवस्थापक दिपक सावंत यांनी टीम कारवाईसाठी गेली असल्याचं सांगितलं. प्रभाग अधिकार त्याविरोधात कारवाई करणार, असं देखील ते म्हणाले. त्यानंतर आम्ही प्रभाग अधिकारी चंद्रकांत जगताप यांना विचारलं असता त्यांनी आमच्या प्रभागात एकच बॅनर लागला होता, असं सांगितलं. पण शहरात अन्य ठिकाणीही बॅनर लावलेले आहेत. यावरुन प्रशासनाला कारवाई करायची नाही, हे दिसून येतंय. आता खरंच कारवाई होते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
हेही वाचा :
उत्तर प्रदेशात भीषण अपघात, बसमध्ये 135 प्रवासी झोपेत असताना काळाचा घाला, देशाला हादरवणारी घटना