मुंबई : महाराष्ट्रसह संपूर्ण देशभरात खळबळ उडून दिलेल्या भीमा कोरेगाव एल्गार परिषद प्रकरणात गौतम नवलखा यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नवलखा यांनी याआधी सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयात जामिनासाठी दाद मागितली होती. तेथे त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी आता नियमित जामिनासाठी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार नवलखा यांना सध्या नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहातून हलवून एका घरामध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. नवलखा हे ऑगस्ट 2018 पासून न्यायालयीन कोठडीत आहेत.
मानवाधिकार कार्यकर्ते असलेले गौतम नवलखा यांनी याआधी सप्टेंबरमध्ये विशेष न्यायालयात जामीन अर्ज केला होता. प्रकृती ठीक नसल्याच्या कारणावरून त्यांनी जामीनासाठी दाद मागितली होती. मात्र विशेष एनआयए न्यायालयाचे न्यायाधीश राजेश कटारिया यांनी त्यांना जामीन मंजूर करण्यास स्पष्ट नकार दिला होता.
एल्गार परिषदेच्या आयोजनादरम्यान घडलेल्या गुन्ह्यात नवलखा यांचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी पुरावे दिसून येत आहेत, असे निरीक्षण सत्र न्यायाधीश कटारिया यांनी नोंदवले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना महिनाभर नजरकैदेत ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे.
गौतम नवलखा यांनी नियमित जामिनासाठी दाखल केलेल्या अपिलाची सोमवारी न्यायमूर्ती ए. एस. गडकरी आणि न्यायमूर्ती पी. डी. नाईक यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने गंभीर दखल घेतली. खंडपीठाने त्यांच्या अपिलावर राष्ट्रीय तपास यंत्रणेला बाजू मांडण्यास सांगितले आहे. त्यासाठी तपास यंत्रणेला नोटीस बजावण्यात आली आहे.
नवलखा हे एल्गार परिषद प्रकरणातील 15 आरोपींपैकी एक असून त्यांच्याविरोधात अद्याप खटल्यासाठी आरोपनिश्चिती करण्यात आलेली नाही. या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा काय भूमिका मांडते, त्यावर नवलखा यांच्या नियमित जामीनाचे भवितव्य ठरणार आहे.