GST : 2215 कोटींची बोगस बिलं बनवणाऱ्या सूत्रधारास अटक, कशी केली फसवणूक?
नंदकिशोर शर्मा हा अशा प्रकारच्या 26 बोगस कंपन्या चालवत असून, या कंपन्यांमार्फत आतापर्यंत 2215 कोटी रुपयांची बोगस बिले बनविण्यात आलेली आहेत. फसवणुकीचे हे सर्वात मोठे प्रकरण समोर आल्याने राज्यात खळबळ माजली आहे.

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून (GST) बोगस बिलांसंदर्भात (Bogus Bills) सुरु असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत नंदकिशोर बालूराम शर्मा यांस अटक करण्यात आली. साई गुरु एन्टरप्राईज व इतर आठ कंपन्यांबाबत वस्तू व सेवाकर विभागाकडून (Service Tax) अन्वेषण कारवाई सुरु करण्यात आली होती. या संदर्भातील तपासात या सर्व बोगस कंपन्या नंदकिशोर बालूराम शर्मा नावाचा व्यक्ती चालवत असल्याचे आढळून आले. सदर व्यक्तीच्या अधिक चौकशीमध्ये आढळून आले की, नंदकिशोर शर्मा हा अशा प्रकारच्या 26 बोगस कंपन्या चालवत असून, या कंपन्यांमार्फत आतापर्यंत 2215 कोटी रुपयांची बोगस बिले बनविण्यात आलेली आहेत. फसवणुकीचे हे सर्वात मोठे प्रकरण समोर आल्याने राज्यात खळबळ माजली आहे. यात आणखीही काही महत्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.
कशी बनवली बोगस बिलं?
या बोगस बिलांमध्ये डायमंड, कपडे, स्टील इत्यादी वस्तूंच्या बिलांचा समावेश आहे. याप्रकरणी वस्तू व सेवाकर विभागाला 126 कोटी रुपयांची करचोरी उघड करण्यात यश आले आहे. ह्या प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर धागेदोरे आहेत का? याबाबतचा तपास सुरु आहे. महानगर दंडाधिका-यांनी सदर व्यक्तीस 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदर धडक कारवाई सहाय्यक राज्यकर आयुक्त गणेश विलास रासकर, अविनाश, चव्हाण, संजय मो. शेटे व इतर सहाय्यक राज्यकर आयुक्त यांनी संयुक्तपणे राबविली तसेच, या कार्यवाहीत सर्व राज्यकर निरीक्षकांचे महत्वाचे योगदान राहीले.
मोठं रॅकेट उघडकीस
ही संपूर्ण कारवाई श्री. संजय विष्णू सावंत, राज्यकर उपआयुक्त व राहुल व्दिवेदी (भा.प्र.से.) राज्यकर सहआयुक्त, अन्वेषण- अ, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. मा. श्री. राहुल व्दिवेदी (भा.प्र.से.) यांनी नुकताच राज्यकर सहआयुक्त अन्वेषण-अ, मुंबई या पदाचा कार्यभार स्विकारला असून, केवळ दोन आठवड्यांच्या कालावधीत बोगस बिलांसंदर्भात एक मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. या मोहिमेद्वारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्याना एक प्रकारे इशारा दिलेला आहे. पुन्हा एकदा जीएसटी विभाग या कारवाईनंतर अलर्ट मोडवर आला आहे. येत्या काही दिवसात अशा आणखी काही मोठ्या कारवाई होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहेत.
Video : नगराध्यक्षाची अधिकाऱ्याला मारहाण! संपूर्ण प्रकार CCTV त कैद; मारहाणीचं कारण नेमकं काय?
Sanjay Biyani Murder: दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेले बिल्डर संजय बियाणी कोण आहेत?
Amravati Murder : गळा आवळून बायकोनं नवऱ्याला संपवलं! हत्येआधी पतीला इलेक्ट्रीक पोलला लटकवलं