Juhu Murder : आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा! जुहू येथे 74 वर्षीय महिलेच्या हत्येनं खळबळ
बेसबॉल बॅटने मुलाचे आईवर वार, नंतर मृतदेह बॉक्समध्ये भरुन काय केलं? वाचा जुहू येथील धक्कादायक हत्याकांड
मुंबई : जुहूमध्ये एका 74 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली. ही हत्या महिलेच्या मुलानेच केल्याचं उघड झालं आहे. हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलासह त्याच्या साथीदारालाही अटक केलीय. या घटनेनं आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासला गेलाय. बेसबॉल बॅटने मुलाने आपल्या आईचा खून केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव वीण कपूर आहे. तर अटक करण्यात आलेल्या मुलाच नाव सचिन कपूर असून त्याच्या साथीदाराचं नाव लालूकुमार मंडल आहे.
जुहू पोलिसांनी या हत्येप्रकरणी गुन्हा नोंदवून घेत दोघांनाही ताब्यात घेतलं. त्यांना 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सचिन कपूर याने घरातील नोकर असलेल्या लालूकुमार मंडलच्या साथीने आपल्या आईच्या हत्येचा कट रचला होता, असा आरोप करण्यात आला आहे.
आईची घरातच हत्या करुन मुलाने घरातील नोकराच्या मदतीने आईचा मृतदेह एका बॉक्समध्ये भरला. त्यानंतर हा बॉक्स कारमध्ये ठेवून तो मृतदेह नदीत फेकून दिला. पण त्याआधी त्याने आईचा जीव घेण्यासाठी बेसबॉल बॅटने वीणा कपूर यांना मारहाण केली होती, अशी माहिती जुहू पोलीसांनी दिली आहे.
ज्या घरात हे हत्याकांड घडलं, त्या घरात सीसीटीव्ही देखील लावण्यात आले होते. पण हत्येआधी सचिन याने सीसीटीव्ही काढून त्यांची विल्हेवाट लावली होती. आपण कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊ नये यासाठी हत्येचं आधीच सर्व प्लानिंग करण्यात आलं होतं, असा संशय पोलिसांना आहे.
वीण कपूर यांचा मृतदेह एका बॉक्समध्ये भरुन हा बॉक्स माथेरान परिसरातील एक नदीत फेकण्यात आला होता. शिवाय सीसीटीव्ही आणि डीव्हीआर (सीसीटीव्हीचं रेकॉर्डिंग) देखील त्याच ठिकाणी फेकून देण्यात आलेला.
वीणा कपूर बेपत्ता असल्याची तक्रार जुहू पोलीस स्थानकात करण्यात आली होती. या तक्रारीवरुन पोलिसांनी इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास करण्यात सुरुवात केली. 6 डिसेंबर रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आलेली. त्यानुसार पोलिसांनी जेव्हा सीसीटीव्ही पाहिलं, तेव्हा सचिन कुपूर हा आपल्या नोकराच्या साथीने एक बॉक्स इमारतीच्या आवारातून घेऊन जाताना दिसला होता.
पोलिसांनी सचिन आणि त्याचा नोकर लालूकुमार यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. पोलिसी खाक्या दिसताच दोघांनीही आपणच हत्या केली असल्याचं कबुली दिली. त्यानंतर पोलिासंनी कलम 302, 201 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करत दोघांनाही अटक केलीय.
सचिन कपूर आणि वीण कपूर यांच्या संपत्तीचा वाद होता. 6 डिसेंबर रोजी त्यांचं कडाक्याचं भांडण झालं होतं. त्यातूनच सचिन याने आईच्या हत्येचा कट रचला असल्याचा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी आता अधिक तपास केला जातोय.
धक्कादायक बाब म्हणजे वीणा कपूर यांनी आपल्या वकिलाच्या मदतीने आपल्या मुलाच्या विरोधात आधी पोलीस तक्रार दिली होती. आपल्या जीवाला धोका आहे, अशी तक्रार त्यांनी एकदा नव्हे तर दोनदा दिली होती. पहिली तक्रार 23 नोव्हेंबर तर दुसरी तक्रार 30 नोव्हेंबर रोजी करण्यात आली होती. आपला मुलगा सचिन कपूर हा आपल्याला जीवे मारण्याची धमकी देत असल्याचं वीणा कपूर यांनी तक्रारीत म्हटलं होतं. पण 6 डिसेंबर रोजी अखेर वीण कपूर यांच्या हत्येनं आता सगळेच हादरुन गेले आहेत.