शेजारच्याची काहीच चूक नाही तरी त्याच्या कानाचं तुकडं पाडलं, कल्याणमध्ये नेमकं काय घडलं?
कल्याणमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आरोपीने अतिशय वाईट कृत्य केलं आहे. विशेष म्हणजे कल्याणमध्ये अशा घटना वारंवार समोर येत आहेत. आरोपींना पोलिसांची भीती राहिलेली नाही का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.

कल्याण | 12 ऑगस्ट 2023 : कल्याणमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालीय. गुन्हेगारांना पोलिसांचं काहीच भय राहिलेलं नाही, अशी परिस्थिती आहे. कल्याणच्या चक्की नाका परिसरात एका जोडप्याला मारहाण केल्याची बातमी ताजी असताना आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणाने नशेसाठी घरातल्यांसोबत भांडण सुरु केलं. त्यानंतर मध्यस्थीसाठी पडलेल्या शेजारच्यावर त्याने हल्ला केला. त्याने शेजारच्याचा कानाला इतका मोठा चावा घेतला की त्या व्यक्तीच्या कानाचं तुकडं पडलं. संबंधित प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
कल्याण बाजारपेठ परिसरात राहणाऱ्या आरोपीने नशा करण्यासाठी पैसे पाहिजे म्हणून घरातील लोकांशी भांडण सुरू केले. आरोपीने भांडण सोडवण्यास गेलेल्या शेजारी राहणाऱ्या तरुणाच्या कानाचा जोरदार चावा घेतला. यामध्ये तरुण जखमी झाला. याप्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला ताब्यात घेतले आहे. अजीम खान असे या आरोपीचे नाव आहे.
नेमकं प्रकरण काय?
कल्याण पश्चीमेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड परिसरात अजीम खान हा तरुण राहतो. तो नशेबाज आहे. नशा करण्यासाठी तो घराच्या लोकांकडे वारंवार पैसे मागतो. त्यासाठी त्याने घरातील वस्तू देखील विकल्या आहेत. त्याने शुक्रवारी (11 ऑगस्ट) नेहमीप्रमाणे घरात पैसे मागितले. मात्र त्याला पैसे मिळाले नसल्याने त्याने घरात भांडण सुरु केले.
अजीमचा जोरजोरात आवाज येत असल्याने घरा शेजारी राहणारा अजीमचा भाऊ आणि त्याचा एक मित्र अख्तर घरात गेले. त्या दोघांनी अजीम याला पकडून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त झालेल्या अजीम याने अख्तर याच्या कानाला जोरदार चावा घेतला. हा चावा इतका जोरदार होता की यात कानाला एक भागच तुटला. त्यानंतर परिसरातील लोकांनी घरात जाऊन त्याची सुटका केली.
अख्तरला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या या प्रकरणी कल्याण बाजार पेठ पोलिसानी गुन्हा दाखल केलाय. आरोपी अजीम खान याला ताब्यात घेण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलीस पुढचा तपास करत आहेत.