बेकायदा इमारतीवर कारवाई नको म्हणून केडीएमसी अधिकाऱ्यांनी 25 लाख घेतले, बिल्डराचा आरोप, ACB कडे चौकशीची मागणी
बेकायदा बांधकाम प्रकरणी अधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याच्या आरोपाचा चौकशी सुरु असताना संबंधित बिल्डरने या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली आहे.
कल्याण (ठाणे) : बेकायदा बांधकाम प्रकरणी अधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याच्या आरोपाचा चौकशी सुरु असताना संबंधित बिल्डरने या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली आहे. या प्रकरणात स्वत: आयुक्त सामील असल्याने काही ठोस कारवाई केली जात नसल्याचा गंभीर आरोप बिल्डरने केला आहे. मात्र या प्रकरणी 17 सप्टेंबरपर्यंत चौकशी पूर्ण होणार आहे. तथ्य आढळून आल्यास दोषींच्या विरोधात कारवाई केली जाईल. इतकेच नाही तर बेकायदा इमारती पाडण्याची कारवाई सुरुच राहणार असल्याचे केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
काही दिवसांपूर्वी कल्याण पूर्व भागातील दावडी परिसरात असलेली बेकायदा सहा मजली इमारत केडीएमसीने पाडली. ही इमारत न पाडण्यासाठी अधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याचा आरोप बिल्डर मुन्ना सिंग यांनी केला होता. इमारत पाडण्यापूर्वी अधिकारी दीपक शिंदे आणि अनंत कदम यांनी प्रत्येकी एक लाख रुपये स्वत: साठी घेतले. तसेच आयुक्तांच्या नावे 25 लाख रुपये घेतल्याचा आरोप करीत बिल्डरने अधिकाऱ्यांसोबत हॉटेलमध्ये चर्चा करीत असल्याचा एक सीसीटीव्ही सादर केला होता.
केडीएमसीच्या तीन सदस्यीय समितीकडून चौकशी सुरु
दरम्यान कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार नाही असं अधिकारी म्हणत असतील तर ते बिल्डर मुन्ना सिंगसोबत काय करीत होते? असा प्रश्न काही लोकांकडून उपस्थित केला जातोय. या प्रकरणाचा तपास केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सूनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 3 सदस्यीय चौकशी समिती करीत आहे. या चौकशी समितीसमोर बिल्डरचा जबाब घेण्यात आला आहे.
मनसे आमदार राजू पाटील यांची लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे चौकशीची मागणी
दुसरीकडे या प्रकरणी मनसे आमदार राजू पाटील यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे चौकशीची मागणी केली होती. आठ ते दहा दिवस उलटून गेले तरी अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. अधिकाऱ्यांविरोधात ठोस कारवाई करण्यात यावी यासाठी लाललुचपतप प्रतिबंधक खात्याकडे बिल्डरने तक्रार केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. या प्रकरणात आयुक्त स्वत: सामील असल्याने या प्रकरणात कारवाई होणार नाही, असा गंभीर आरोप बिल्डर सिंगने केला आहे.
केडीएमसी आयुक्त विजय सू्र्यवंशीची नेमकी भूमिका काय?
या प्रकरणावर केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी प्रतिक्रिया दिली. “17 सप्टेंबपर्यंत समिती अहवाल सादर करणार आहे. तथ्य आढळून आल्यास कारवाई केली जाईल. जो काही पुरावा आहे, बिल्डरने केडीमसी समितीकडे सादर करावा. बेकायदा बांधकामांच्या विरोधात कारवाई सुरु राहणार आहे. कारवाई टाळण्यासाठी असे आरोप केले जातात. आतापर्यंत गेल्या दीड वर्षात 620 बेकायदा इमारतींच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे”, अशी भूमिका विजय सूर्यवंशी यांनी मांडली.
हेही वाचा :