मृत्यूनंतरही चर्चा संपेना, डोंबिवलीतील शिक्षणसम्राटाचा मृत्यू की हत्या? चौकशी करा, कोर्टाचे पोलिसांना आदेश
डोंबिवलीतील शिक्षणसम्राट शिवाजी जोंधळे याचा मृत्यू की हत्या आरोपांची चौकशी करा, असा आदेश कोर्टाने पोलिसांना दिला आहे. मुलाच्या आरोपानंतर कोर्टाने पोलिसांना आदेश दिले आहेत. या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंबिवलीतील शिक्षणसम्राट शिवाजी जोंधळे यांचा मृत्यू आजारपणामुळे नव्हे, तर त्यांना वेळेवर उपचार मिळू दिले नसल्यानेच झाल्याचा आरोप त्यांचा मुलगा सागर जोंधळे यांनी केला आहे. या प्रकरणी सागर जोंधळे यांनी कल्याण न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आणि चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार विष्णूनगर पोलिसांनी गीता खरे यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शिवाजी जोंधळे यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या अफाट कामामुळे ते ‘शिक्षणसम्राट’ म्हणून ओळखले जात होते. डोंबिवली, ठाकुर्ली, अंबरनाथ, आणि आसनगाव या ठिकाणी त्यांनी 27 शिक्षण संस्था स्थापन केल्या. त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी दिली. शिवाजी जोंधळे यांचा 19 एप्रिलला आजारामुळे मृत्यू झाला. पण त्यानंतरही त्यांच्या मृत्यूबाबतचा वाद मिटलेला नाही.
सागर जोंधळे यांचा नेमका आरोप काय?
सागर जोंधळे यांनी आरोप केला आहे की, वडिलांना गंभीर आजार असतानाही, त्यांच्या दुसऱ्या पत्नी गीता खरे आणि इतरांनी वेळेत उपचार न करता त्यांना घरात ठेवले आणि नातेवाईकांना भेटण्यास बंदी घातली. तसेच, त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच, त्यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेची घाईघाईने नोंदणी करून घेतली.
या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुराव आणि काही गुंडांनी मदत केल्याचा आरोपही सागर जोंधळे यांनी केला आहे. सागर जोंधळे याच्या याचिकेवर निर्णय देताना कल्याण न्यायालयाने विष्णूनगर पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आणि चौकशी करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर विष्णूनगर पोलिसांनी दुसऱ्या पत्नी गीता खरे यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र याबाबत गीता खरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न असफल ठरला. तर त्यांचे साथीदार प्रमोद हिंदुराव यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.