कल्याण : कल्याणमध्ये गुरुदेव हॉटेलसमोर (Gurudev Hotel) बसमध्ये गॅसगळती (Kalyan News) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. भर रस्त्यामध्ये चालत्या बसमध्ये अचानक एक आवाज झाला. त्यानंतर चालकाला संशय आल्याने त्याने बस एका बाजूला थांबवली. यावेळी बसमधून गॅस गळती (Bus Gas Leak in Kalyan) होत असल्याचं लक्षात आल्यानं चालकाने प्रसंगावधान राखलं. बसमधील प्रवाशांना लगेचच खाली उतरवून बस रिकामी केली. त्यामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळला.
यानंतर अग्निशमन दलाला याबाबत कळवण्यात आली. अग्निशमन दलाकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली. त्यांनी तातडीने बसच्या दिशेने धाव घेतली आणि बसमधील गॅस सिलिंडरवर पाणी फवारुन परिस्थिती आटोक्यात आणली.
यावेळी सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला होता. थोडक्यात मोठा अनर्थ टळल्यानं प्रवाशांसह सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. चालकाने वेळीच प्रसंगावधान राखल्यामुळे प्रवाशांनीही चालकाचे आभार मानलेत.
सुदैवानं यावेळी मोठी दुर्घटना टळली. नाशिकमध्ये झालेल्या बस दुर्घटनेप्रमाणेच कल्याणमध्ये गॅस गळतीमुळे बस पेटण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र वेळीच सतर्कता बाळगल्यानं थोडक्यात निभावलं.
नाशिकमध्ये खासगी बस आणि कंटेनरमध्ये धडक होऊन भीषण अपधात झाला होता. नुकत्याच झालेल्या या भीषण अपघातात 12 जणांचा होरपळून मृत्यू झालेला. यवतमाळच्या पुसदहून मुंबईला जाणाऱ्या बसच्या डिझेल टँक फुटून आग भडकली होती. या आगीत बस जळून खाक झालेली.
या घटनेनंतर बसमध्ये आग लागण्याच्या अनेक घटनाही समोर आल्या होत्या. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती. खासगी बसमध्ये आग लागण्याच्या घटना वारंवार समोर यत असतानाच आता कल्याणमध्ये एका प्रवासी मधून गॅस गळती होत असल्याचं समोर आल्यानं खळबळ उडाली होती.