धक्कादायक ! यूपीतून येणाऱ्या काकांना घेण्यासाठी दोन भाऊ रेल्वे स्टेशनला, ट्रेनची वाट पाहत असताना तिघांनी चाकू दाखवला
कल्याण पूर्व भागात राहणारा निरज वर्मा हा 18 वर्षीय तरुण त्याच्या चुलत भावासोबत कल्याण रेल्वे स्थानकात कल्याण पूर्वेतील रेल्वे तिकीट घराजवळ बसला असताना संबंधित प्रकार घडला.
कल्याण (ठाणे) : उत्तर प्रदेशाहून येणाऱ्या आपल्या नातेवाईकांना घेण्यासाठी आलेल्या दोन भावांना तीन जणांनी लूटल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानकात घडली होती. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. त्यामुळे या आरोपींना जेरबंद करण्यात कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचला यश आलं आहे. श्रेयस कांबळे, आकाश माने आणि रुपेश कनोजिया अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी केलेले मोबाईल हस्तगत केले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
कल्याण पूर्व भागात राहणारा निरज वर्मा हा 18 वर्षीय तरुण त्याच्या चुलत भावासोबत कल्याण रेल्वे स्थानकात कल्याण पूर्वेतील रेल्वे तिकीट घराजवळ बसला होता. निरज याचे मामा उत्तर प्रदेशहून कल्याणला येत होते. त्यांना घेऊन जाण्यासाठी दोघे भाऊ गाडीची वाट पाहत होते. या दरम्यान तीन तरुण या दोघांच्या जवळ आले. या तिघांनी चाकूचा धाक दाखवित निरज आणि त्याच्या भावाकडून महागडा मोबाईल हिसकावून घेतला आणि पळ काढला.
पोलिसांनी आरोपींना कसं पकडलं?
संबंधित घटना ही सीसीटीव्हीत घटना कैद झाली होती. या घटनेप्रकरणी कल्याण जीआरपीत तक्रार दाखल करण्यात आलेली. जीआरपी पोलिसांसोबत कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचचे पोलीस सुद्धा आरोपीच्या शोधात होते. अखेर पोलिसांनी कल्याण पूर्व विठ्ठलवाडी परिसरात राहणाऱ्या तिघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचचे पोलीस अधिकारी अरशद शेख यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
पोलिसांची प्रतिक्रिया
पोलीस अधिकारी अरशद शेख यांनी प्रतिक्रिया दिली. “आरोपी श्रेयस कांबळे, आकाश माने आणि रुपेश कनोजिया या तिघांपैकी कनोजियाच्या विरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. सीसीटीव्हीच्या सहाय्याने तिघांना अटक केली आहे. या तिघांनी आतापर्यंत किती लोकांना लूटले याचा तपास सुरु आहे”, अशी प्रतिक्रिया शेख यांनी दिली.