गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई : मुंबईच्या (Mumbai Firing News) पश्चिम उपनगरातील कांदिवलीत खळबळजनक घटना घडलीय. कांदिवलीमध्ये मध्यरात्री अचानक गोळीबार (Kandivali Firing) करण्यात आला. तब्बल 4 राऊंड फायरींग झाल्याची माहिती समोर आलीय. या गोळीबारात एक जण ठार झालाय. तर अन्य तिघे जखमी झालेत. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. कांदिवली पश्चिमेच्या (Kandivali West Firing) लालजी पाडा परिसरात गोळीबार झाल्यानंतर एकच खळबळ माजली होती.
30 सप्टेंबरच्या मध्यरात्री दोघे जण कांदिवलीत बाईकवरुन आले. त्यांनी अचानक गोळीबार करण्यास सुरुवात केली. परस्परांमध्ये असलेल्या वादातून गोळीबार करण्यात आला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. या घटनेची माहिती मिळताच कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास सध्या कांदिवली पोलिसांकडून केला जातोय.
बाईकवरुन आलेल्या दोघांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यांनी बंदुकीतून चार राऊंड फायरींग केली. ज्यात चार लोकं जखमी झाली. अकिंत यादव, अविनाश दाभोळकर, मनिष गुप्ता आणि प्रकाश नारायण अशी गोळीबारात जखमी झालेल्यांची नावं आहेत. गंभीर जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शताब्दी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.
ज्या ठिकाणी गोळीबार झाला, त्या इमारतीच्या चौकीदाराने सांगितले की, जेव्हा आम्हाला गोळ्यांचा आवाज आला तेव्हा आम्हाला वाटलं की फटाके फुटत आहेत. जेव्हा बाहेर आलो तेव्हा पाहिले की एका तरुणावर गोळी झाडलीय. तो जमिनीवर पडला होता. गोळ्या झाडणाऱ्या आरोपीला लोक पकडून मारत होते त्यानंतरही तो दोन राऊंड फायर करून पळून गेला.
दरम्यान, माजी नगरसेवक कमलेश यादव यांनी म्हटलंय, की गोळीबार करणारा आणि ज्याला गोळी लागली ते आजूबाजूच्या परिसरात राहणारेच तरुण होते. दहीहंडीच्या भांडणातून गोळीबार झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय.
डीसीपी विशाल ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करुन बाईकवर आलेले दोघे हल्लेखोर फरार झाले आहेत. त्यांना शोधण्याचं काम सुरु आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यास सुरुवातही केलीय. तसंच हल्लेखोरांना पकडण्यासाठी पथकही तैनात करण्यात आलंय. नेमक्या या गोळीबार करण्यामागचं कारण काय होतं, याचा छडा लावण्याचं आव्हान सध्या मुंबई पोलिसांसमोर उभं ठाकलंय.
20 दिवसांच्या फरकाने मुंबई दुसऱ्यांना गोळीबाराची घटना समोर आलीय. याआधी 9 सप्टेंबर रोजी देखील गोळीबाराची घटना घडली होती. वांद्रे परिसरात 9 सप्टेंबर रोजी गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात एक जण जखमी झाला होता. त्यानंतर आता 30 सप्टेंबरच्या मध्यरात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं मुंबई पोलिसांची झोप उडवलीय.