मुंबई : कुर्ला इमारत (Kurla Building Collapse) दुर्घटनेती हृदय हेलावणारी कहाणी समोर आली आहे. एका कुटुंब अवघं तीन दिवस आधी या इमारतीत राहायला आलं होतं. पण आपल्या आयुष्यात पुढे एवढं भलंमोठं संकट वाढून ठेवलंय, याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती. नव्या ठिकाणी राहायला आलेल्यानं घरही अजून लागायचं होतं. पण काळानं सगळं उद्ध्वस्त केलं. कुटुंबातील बायको आणि मुलाला घेऊन तीन दिवसांपूर्वीच कुर्ल्यातील (Kurla News) या इमारतीत रमेश बडीया राहायला आला होता. आपली बायको देवकी आणि मुलगा प्रीत यांच्यासोबत तो इथं मुक्कासाठी आला होता. पण इमारत दुर्घटनेत अख्खं कुटुंब गाडलं गेलं. रात्रभर रेस्क्यू ऑपरेशन (Mumbai News) सुरु होतं. त्यातून अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या रमेशला राजावाडी रुग्णालयात तातडीनं देण्यात आलं. पण तिथं त्याला मृत घोषित करण्यात आलं. तर त्याची पत्नी आणि मुलगा या दुर्घटनेतून बालंबाल बचावले. पण आता जगायचं कसं असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकलंय.
रमेश हा सहकुटुंब आपल्या भावासोबत राहात होता. तीन दिवसांपूर्वीच तो या इमारतीत राहायला आला होता. रमेशचं वय 50 वर्ष होतं. जेव्हा त्याच्या भावाला आणि वहिनीला इमारत दुर्घटनेची माहिती मिळाली, तेव्हा ते रमेश यांचा फोटो घेऊन शोध घेऊ लागले. विचारपूस करु लागले. पण कुठेच रमेशचा पत्ता लागू शकला नाही. अखेर त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली. यानंतर बडीया कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.
एका ज्येष्ठ नागरीक महिलेच्या बाबतीतही अशीच काळीज पिळवटून टाकणारी बातमी समोर आली. लता शिंदे नावाची महिला आपल्या भावाच्या शोधात इमारत दुर्घटनेच्या ठिकाणी आली होती. 65 वर्षांचा त्यांचा भाऊ प्रल्हाद, त्यांची बायको लिलाबाई (60) आणि मुलगा अजिंक्य (34) यांचाही कुठेच शोध लागू शकला नव्हता. अखेर रात्री उशिरा तिघांचीही मृत्यू झाल्यानं लता शिंदे यांना कळलं आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. विशेष म्हणजे अजिंक्य यांची पत्नी आणि मुलगा ही दुर्घटना घडली तेव्हा घरात नव्हते. त्यामुळे त्यांच्यावरही घरातील कर्ता गमावल्याचा मोठा आघात झाला आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिचा पिंटो यांनी याबाबतचं वृत्त दिलंय.
तब्बल 19 जणांचा कुर्ला दुर्घटनेत मृत्यू झालाय. तर 14 जणांना वाचवण्यात यश आलं होतं. इमारत दुर्घटनेनंतर 15 तासांहूनही अधिक काळ या ठिकाणी बचावकार्य केलं जात होतं. सोमवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. कुर्ला नेहरु नगरच्या नाईक नगर येथील चार मजली इमारत अगदी पत्त्यासारखी कोसळली होती. अनेकजण या नंतर ढिगाऱ्याखाली जिवंत गाडले गेले होते.