डोंबिवली : राहत्या घरातील सोफा-कम-बेडमध्ये (sofa-cum-bed) मृतदेह आढळलेल्या विवाहितेच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी गुरुवारी संशयित व्यक्तीचा फोटो दाखवल्यानंतर सुप्रिया शिंदे (Supriya Shinde) यांचे पती चकित झाले. “हा माणूस माझ्या पत्नीला ओळखतो, याची मला कल्पनाही नव्हती. तो आमच्या घरापासून काही अंतरावरच राहतो. सुप्रिया हरवल्याची तक्रार देण्यासाठी तो माझ्यासोबत पोलिस स्टेशनलाही आला होता” असं शिंदेंच्या पतीने सांगितलं. ‘मिड-डे’च्या वेबसाईटवर यासंदर्भात बातमी देण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरात (Dombivali Murder) राहणाऱ्या 33 वर्षीय सुप्रिया शिंदे यांची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. मंगळवार 15 फेब्रुवारीला दिवसभर बेपत्ता असलेल्या सुप्रिया यांचा मृतदेह राहत्या घरातील सोफा सेटमध्ये आढळल्याने एकच खळबळ उडाली होती.
दावडी गावातील शिवशक्ती नगर येथील ओम रेसिडेन्सी येथे मंगळवारी रात्री सुप्रिया शिंदे यांचा मृतदेह घरातील सोफा-कम-बेडमध्ये आढळल्यानंतर मानपाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. टायने गळा आवळून त्यांचा खून झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस रक्त होते. घरात कोणी जबरदस्ती घुसल्याची चिन्हं नसल्यामुळे सुप्रिया यांच्या संमतीनेच मारेकरी आत आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
“मी कित्येक वेळा त्याला [संशयित आरोपी] पाहत असे. मला माहित आहे की तो आमच्या घरापासून काही इमारती सोडूनच राहतो. आणि क्वचितच तो घरी यायचा. माझी पत्नी बेपत्ता झाली, तेव्हा तो माझ्यासोबत पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी आला होता” असे सुप्रिया यांचे पती किशोर शिंदे यांनी सांगितले. माझ्या पत्नीची ज्याच्याशी पुसटशी ओळख आहे, तो हत्या प्रकरणातील संशयित असेल, अशी कल्पना मी स्वप्नातही केली नव्हती. मला अजूनही धक्का बसला आहे. माझ्या पत्नीचा खून कशामुळे झाला असावा, हे मला कळत नाही” अशी प्रतिक्रिया 37 वर्षीय पती किशोर शिंदे यांनी दिली.
किशोर यांनी सांगितल्यानुसार “माझ्यासाठी तो नेहमीसारखा दिवस होता. मी मंगळवारी सकाळी 9.30 वाजता कामावर निघालो. त्यावेळी सुप्रिया म्हणाली की तिची तब्येत ठीक नाही. मी तिला विश्रांती घेण्यास सांगितले आणि निघालो” सुप्रिया-किशोर यांच्या लग्नाला 12 वर्ष झाली होती. त्यांना 10 वर्षांचा श्लोक हा मुलगा आहे.
“सुप्रिया श्लोकला घेण्यासाठी शाळेत गेली नसल्याचे सांगण्यासाठी आमच्या शेजारी स्वाती जाधव यांनी संध्याकाळी 5.30 वाजता मला फोन केला. मी सुप्रियाला वारंवार फोन करत होतो, पण काहीच उत्तर येत नव्हते. मी माझ्या मित्राला घरी जाऊन पाहायला सांगितलं, मात्र दरवाजा बंद असल्याचं त्याने कळवलं. काम आटोपून मी रात्री 8.30 वाजता घरी पोहोचलो. आमच्या शेजाऱ्यांकडे ड्युप्लिकेट चावी होती, त्याने दरवाजा उघडला तर आत कोणीही नव्हते.” बराच वेळ सुप्रियाचा शोध घेतल्यानंतर त्यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार दाखल केली.
मानपाडा पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “सुप्रिया शिंदेंचे पती पोलीस स्टेशनमधून गेल्यानंतर एका तासाच्या आतच त्यांनी आम्हाला फोन केला, की त्यांना घरातील सोफा-कम-बेडमध्ये बायकोचा मृतदेह सापडला आहे.” सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यांनी गुरुवारी एका संशयिताला पकडले.
“मी अंत्यसंस्कारासाठी सुप्रियाचा मृतदेह सातारा येथील आमच्या गावी आणला. मला सांगण्यात आले की पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे आणि त्याचा फोटो शेअर केला आहे. तो आमच्या इमारतीभोवती रेंगाळत असायचा, पण मला कधीच कल्पना नव्हती की तो माझ्या पत्नीला ओळखतो” असं किशोर म्हणाले. “मला सुप्रियाच्या मैत्रिणीने सांगितले होते की संशयित हा माझ्या पत्नीचा मित्र आहे आणि ते वर्षभरापूर्वी पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले होते”
संशयित तरुणाने ज्या प्रकारे भावनांशी खेळ केला, त्यामुळे किशोर हैराण झाला आहे. “त्यानेच आम्हाला पोलीस ठाण्यात जाण्याची सूचना केली. माझ्या मुलाकडून त्याची आई हिरावून घेणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी” अशी मागणी त्यांनी केली. डीसीपी सचिन गुंजाळ म्हणाले की “आम्ही या प्रकरणाचा छडा लावला आहे आणि एका व्यक्तीला अटक केली आहे, लवकरच अधिक तपशील जाहीर केले जातील”
चक्क सोफासेटमध्ये डेडबॉडी! गळा आवळून सुप्रियाची कुणी केली हत्या? डोंबिवलीत खळबळ
बेपत्ता मुलीच्या चिंतेने ज्या बेडवर घालवली रात्र, त्यातच सापडला होता डोंबिवलीच्या स्नेहलचा मृतदेह