भाईंदरमध्ये विवाहितेची गळा आवळून हत्या, ना पुरावे ना साक्षीदार, उत्तर प्रदेशात तिघे आरोपी कसे सापडले?
भाईंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भोलानगर परिसरात राहणाऱ्या सुमनदेवी लाला शर्मा यांची राहत्या घरी हत्या करण्यात आली होती. अज्ञात चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने घरात घुसून गेल्या आठवड्यात त्यांची गळा आवळून हत्या केली होती
भाईंदर : भाईंदरमध्ये महिलेची गळा आवळून हत्या केल्याप्रकरणी तीन आरोपींना उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली आहे. चोरीच्या उद्देशाने घरात घुसून गेल्या आठवड्यात महिलेची हत्या करण्यात आली होती. मुंबईजवळच्या भाईंदर परिसरात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.
भाईंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भोलानगर परिसरात राहणाऱ्या सुमनदेवी लाला शर्मा यांची राहत्या घरी हत्या करण्यात आली होती. अज्ञात चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने घरात घुसून गेल्या आठवड्यात त्यांची गळा आवळून हत्या केली होती. या प्रकरणी भाईंदर पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून कोणताही पुरावा नसताना तीन आरोपींना अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
लाला शर्मा आणि त्यांचा मेव्हणा हे भाईंदर पूर्वेला रबर कंपनीत नोकरी करतात. 21 जुलै रोजी सकाळी ते कामावर गेले होते, त्यावेळी घरी त्यांची पत्नी एकटीच होती. दुपारी सुमनदेवी शर्मा यांच्याशी पतीचे बोलणे झाले होते, मात्र कामावरून रात्री दहा वाजता ते परत आले असता भोला नगर चाळीतील पहिल्या मजल्यावरील घरातील लाईट बंद दिसले. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता सुमनदेवी अंथरुणावर पडलेल्या होत्या. त्यांनी पत्नीला उठवण्याचा प्रयत्न केला असता ती जागी झाली नाही.
मंगळसूत्र, नथ, एटीएम कार्ड चोरीला
सुमनदेवी यांच्या अंगावर घरातील साड्या अस्ताव्यस्त पडल्या होत्या. घरातील सामानही चोरीला गेल्याचे त्यांना दिसले. गळ्यातील मंगळसूत्र, कानातील कुडी आणि नाकातील नथ या दागिन्यांसह तीन मोबाईल हँडसेट, एटीमएम कार्ड आणि साऊंड बॉक्स चोरीला गेले होते. एकूण 35 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता.
उत्तर प्रदेशातून तिघांच्या मुसक्या आवळल्या
मिरा भाईंदर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कुठलाही पुरावा नसतानाही निव्वळ तांत्रिक माहितीच्या आधारे उत्तर प्रदेश राज्यातील बलिया जिल्ह्यातून सोनू विजय चौहान (30), सुधीरकुमार तुलसी चौहान (19) व मुन्नी कुलदीप चौहान (32) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता चोरीच्या उद्देशाने सुमनदेवींची हत्या केल्याची कबुली त्यांनी दिली. या खुनाच्या घटनेत कोणताही प्रत्यक्षदर्शी व्यक्ती किंवा पुरावा नसताना अतिशय कौशल्यपूर्ण तपास करत तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
संबंधित बातम्या :
नांदायला नकार देणाऱ्या पत्नीचे लांबसडक केस पतीने कापले, पिंपरीमध्ये विकृतीचा कळस
पतीचं कोरोनाने निधन, वैधव्याचं दु:ख सोसणाऱ्या वहिणीवर बलात्कार, नणंद-दिराकडून प्रचंड मारहाण