मुंबई : आयव्हीएफ प्रक्रियेमध्ये पतीची फसवणूक केल्याच्या प्रकरणात 37 वर्षीय महिला डॉक्टरला मुंबई सेशन्स कोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. आरोपी महिलेने दुसर्या पुरुषाला इन-विट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) प्रक्रियेच्या संमती फॉर्ममध्ये तिचा पती म्हणून चुकीच्या पद्धतीने सादर केल्याचा आरोप तिच्या पतीने केला होता. ती एक महिला आणि व्यवसायाने डॉक्टर असल्याचा याबाबत न्यायालयाने विचार केला.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश पुरुषोत्तम बी जाधव यांनी या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यास झालेल्या विलंबाकडे लक्ष वेधले, ज्याचे स्पष्टीकरण दिले गेले नाही. हा गुन्हा कथितपणे नोव्हेंबर 2019 मध्ये घडला असताना, यावर्षी एप्रिलमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. मात्र या जोडप्याने तणावपूर्ण परिस्थितीमध्ये लग्न केले असल्याचेही समोर आले आहे.
काय आहे प्रकरण?
फिर्यादी पक्षातर्फे महिला डॉक्टरला दिलासा देण्यास विरोध केला होता. महिला उत्तर प्रदेशची रहिवासी असून ती स्वत: पोलिस स्टेशनमध्ये उपस्थित झाली नव्हती. या प्रकरणी तपास अधिकाऱ्याने न्यायालयाला असेही सांगितले की त्यांना आयव्हीएफ प्रक्रियेनंतर तिने जन्म दिलेल्या बाळांचे काय झाले याबाबतही माहिती घेण्याची गरज आहे.
पतीने खोटा गुन्हा दाखल केल्याचा दावा
यासंदर्भात महिलेच्या वकिलांनी न्यायालयात कळवले की आयव्हीएफ प्रक्रियेनंतर जन्मलेल्या जुळ्या मुलांचा अकाली (प्रीमॅच्युअर बर्थ) जन्म झाला होता आणि जन्मानंतर लगेचच त्यांचा मृत्यू झाला. त्याने त्यांच्या मृत्यूचे प्रमाणपत्र आणि वैद्यकीय रिपोर्टही न्यायालयात सादर केला. त्याने असाही युक्तिवाद केला होता की, पतीने कौटुंबिक वाद आणि पोटगी टाळायची असल्याने पत्नीवर खोटा गुन्हा दाखल केला होता आणि तक्रार दाखल करण्यास 18 महिन्यांच्या विलंब केला होता, याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधले.
…म्हणून संमतीपत्रावर सह अभियुक्ताची सही
या प्रकरणात असं समोर आलं की आयव्हीएफ प्रक्रियेसाठी महिलेच्या पतीने स्वतः महिलेसोबत हजर राहून सॅम्पल देणे आणि इतर सर्व आवश्यक प्रक्रिया स्वतः पूर्ण केली होती. मात्र आयव्हीएफ प्रक्रियेच्या दिवशी पती काही कारणावस्तव उपस्थित नव्हता म्हणून महिलेच्या संमतीपत्रावर सह अभियुक्ताने सही केल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणात सह अभियुक्ताला मुंबई हायकोर्टाने अटकपूर्व जमीन दिला होता. पतीने कौटुंबिक वैमनस्य असल्याच्या कारणाने महिलेवर आरोप करत गुन्हा दाखल केला होता, असंही निदर्शनास आलं आहे.
संबंधित बातम्या :
स्पर्म डोनरपासून जुळं, 5 वर्षांनी नवऱ्याने सोडलं, मग डोनरही मुलांना घेऊन पसार