जेवायला बोलावून अतिप्रसंग, नवी मुंबईत 70 वर्षीय महिलेच्या नग्न मृतदेहाचे गूढ उकलले, लातूरच्या 26 वर्षीय तरुणाला अटक
मिसिंग महिलेचे वय अंदाजे 70 वर्षे, तर मृतदेहाचे वय प्राथमिकताः 35 ते 40 वर्षे वाटत असल्याने त्याची ओळख पटवण्यासाठी नातेवाईकाचा पाठपुरावा करून त्यांना मृतदेहाजवळ मिळालेले कपडे - साडी-ब्लाऊज आणि चप्पल दाखवण्यात आले. त्यावेळी त्यांनी ओळखून गोंदण्याच्या डिझाईनवरुन हा मृतदेह त्यांच्या आईचा असल्याचे सांगितले
नवी मुंबई : वाशीमध्ये 2 ऑगस्ट रोजी सापडलेल्या सत्तर वर्षीय महिलेच्या नग्नावस्थेतील मृतदेहाचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. आरोपीने 70 वर्षीय महिलेला जेवणासाठी बोलावून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र महिलेने विरोध करताच बाजूला पडलेल्या काचेने गळा चिरुन तिची हत्या केल्याचा आरोप आहे. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली होती. अखेर नवी मुंबईतील वाशी पोलिसांनी मूळ लातूरच्या असलेल्या 26 वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
काय आहे प्रकरण?
वाशी रेल्वे स्टेशन लगत पामबीच मार्गावरील पुलाखाली 2 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास एका महिलेचा मृतदेह गोणीत अर्धवट भरलेल्या स्थितीत सापडला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी 20 दिवस, मुंबईची 12 कक्ष, ठाणे 5 कक्ष, नवी मुंबई 20 पोलीस ठाणे तसेच रागयड मधील पोलीस यंत्रणा काम करत होती. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळाला असल्याने त्याची ओळख पटवणे कठीण झाले होते. तरी पोलिसांनी केवळ टॅटूच्या सहाय्याने जवळपास 150 ते 200 सीसीटीव्ही तपासून गुन्ह्याची उकल केली आहे.
हातावरील गोंदण महत्त्वाचा दुवा
मृतदेह शवविच्छेदनासाठी मनपा रुग्णालयात पाठवला होता. तो स्वच्छ धुवून पाहिला असता त्याच्या दोन्ही हातावर विशिष्ट प्रकारची डिझाईन गोंदवलेली दिसून आली. त्याव्यतिरीक्त कोणतेही नाव, पत्ता ओळखण्या इतपत वस्तू, कागदपत्रे मिळाली नव्हती. त्यावरुन घटनास्थळी मिळालेल्या वस्तू, पायातील प्लॅस्टिकची चप्पल, मृतदेहाची साडी ब्लाऊज या व्यतिरिक्त कोणतेही ओळख पटवण्याचे साधन पोलिसांकडे नव्हते. मात्र मृतदेहाच्या हातावरील गोंदण (Tattoo) हाच एक धागा आशादायी वाटत होता. त्यावरून मृतदेहाची ओळख पटवणे ही पहिली पायरी आणि नंतर खुनाचा गुन्हा उघडीस आणण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल यांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करण्यात आली.
…आणि महिलेची ओळख पटली
मिसिंग प्रकरणाची माहिती घेण्यासाठी मुंबई शहर, ठाणे शहर आणि नवी मुंबई शहरातील पोलीस ठाण्यामध्ये पोलीस पथकांनी जाऊन मृतदेहाशी मिळत्या जुळत्या वर्णनाच्या महिलांची मिसिंग प्रकरणे वेगवेगळी करुन त्याचा अभ्यास केला. त्यावेळी मृतदेहाशी मिळत्या जुळत्या वर्णनाची मिसिंग प्रकरण गोवंडी पोलीस ठाण्यात नोंद असल्याचे दिसून आले. परंतु मिसिंग महिलेचे वय अंदाजे 70 वर्षे, तर मृतदेहाचे वय प्राथमिकताः 35 ते 40 वर्षे वाटत असल्याने त्याची ओळख पटवण्यासाठी नातेवाईकाचा पाठपुरावा करून त्यांना मृतदेहाजवळ मिळालेले कपडे – साडी-ब्लाऊज आणि चप्पल दाखवण्यात आले. त्यावेळी त्यांनी ओळखून गोंदण्याच्या डिझाईनवरुन हा मृतदेह त्यांच्या आईचा असल्याचे सांगितले. म्हणजेच गोवंडी पोलीस ठाणे येथे बेपत्ता महिलेचा असल्याचे सिद्ध झाले.
सीसीटीव्हीमध्ये आरोपी दिसला
मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर महिलेचा नेमका वावर वाशी भागात कधी होता. या दृष्टीने वाशी टोलनाका हायवे, वाशी स्टेशन, इनॉर्बिट मॉल आणि शहरातील इतर ठिकाणांचे अनेक कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता 29 जुलै रोजी सायंकाळी महिला एकटीच इनॉर्बिट मॉलच्या सिग्नलच्या आसपास वावरताना दिसली. परंतु रात्री 9.50 वाजताच्या सुमारास तिच्यासोबत एक पुरुष चालत असल्याचे दिसले. संशयित पुरुषाचा चेहरा स्पष्टपणे दिसत नसतानाही त्याच्या शारीरिक हालचालींवरुन मागील दिवसांचे फूटेज तपासले. आठ ते दहा दिवसांच्या अगोदरच्या फूटेजमध्ये संशयित इसम हा त्याचा फोटो ओळखण्या इतपत दिसला.
आरोपीच्या शारीरिक हालचालींवरुन सुगावा
आरोपीचा फोटो वाशी परिसरातील हायवेवरील हॉकर्स, भिकारी, रस्त्यावर झोपणारे, रिक्षा चालक यांना दाखवला. त्यादरम्यान खात्रीशीर माहिती मिळाली की फुटेजमधील व्यक्ती हा डोक्याचे केस उडवणे, वरती करणे, चालताना पाय झटकणे अशा विशिष्ट हालचाली करत असल्याचे समजले. 21 ऑगस्ट रोजी तो दुपारी हावरे फँटासियाजवळ पुलाखाली आल्याचे समजले. त्यावरून पाळतीवर असलेल्या पोलीस पथकाने तात्काळ हालचाली करुन शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपी मूळ लातूरचा
अटक करण्यात आलेला आरोपी लातूरचा असून सध्या काम नसल्याने वाशी आणि सानपाडा पुलाखाली राहत होता. कानीफनाथ दिलीप कांबळे (वय 26 वर्षे) रस्त्यावर राहणारा असून मूळगाव शेडोक ता. निलंगा, जि. लातुर आहे. त्याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्यावरून त्यास अटक करून वाशी कोर्टात हजर काण्यात आले. कोर्टाने 27 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे, सहायक पोलीस आयुक्त विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण, तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा पोलीस निरीक्षक सचिन ढगे, पोलीस उपनिरीक्षक योगेश परदेशी, सहा पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मेंगडे, पोलीस हवालदार शैलेंद्र कदम, संजय भाले, रवि पाटील, पोलीस नाईक-सुनिल चिकणे, विनोद चारींगे, चंदन म्हसकर, महेश जाधव, राजकुमार दुधाळ, पंकज शिंदे, संदीप म्हात्रे, पोलीस अंमलदार गोकुळ ठाकरे, दिलीप ठाकुर, केशव डगळे, अमृत साळी, नितीन जावरे यांनी ही कामगिरी यशस्वीपणे पार पाडली आहे.
संबंधित बातम्या :
मुंबईत 40 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या, पत्नी-मुलं घरात नसताना गळफास