मुंबई : मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेले शेतकरी सुभाष जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुभाष जाधव यांच्या आत्महत्या प्रकरणी मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात मुख्य आरोपी विलास शिंदे याच्यासह त्याच्या कुटुंबातील अनेक सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी सुभाष जाधव यांचा मृतदेह शवविच्छेदन करुन ताब्यात घेतला आणि गावी रवाना झाले.
भारतीय दंड संहिताचे कलम 306, 34 आणि महासावकारी अधिनियम 45 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी सुभाष जाधव यांची पत्नी साधना सुभाष जाधव, मुलगा अजय सुभाष जाधव आणि मुलगी प्रतीक्षा जाधव यांनी सरकारकडे हात जोडून केली. विलास शिंदेंनी आपल्याला आणि कुटुंबियांना मारहाण करुन, अर्धनग्न करुन जमीन बळकावली, असा आरोप सुभाष जाधव यांनी केला होता
काय आहे प्रकरण?
सुभाष जाधव हे पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील रहिवासी होते. शुक्रवार 20 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास ते मुंबईतील मंत्रालय परिसरात आले होते. यावेळी ते गार्डन गेटजवळ येऊन छोट्या बाटलीतील कीटनाशक प्यायले. त्यानंतर ते जमिनीवर कोसळले. यावेळी तिथे तैनात असलेल्या पोलिसांच्या ते नजरेस आले. पोलिसांनी त्यांना तातडीने जी. टी. रुग्णालयात दाखल केलं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण दोन दिवसांच्या उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला.
जमीन व्यवहारात फसवणूक
सुभाष जाधव यांची जमिनीच्या व्यवहारात फसवणूक झाली होती. त्यांनी आपल्याला न्याय मिळावा यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यातही धाव घेतली होती. पण तिथे योग्य प्रतिसाद न मिळाल्याने ते अस्वस्थ होते. आपल्याला न्याय मिळावा यासाठी त्यांनी मंत्रालयात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते शुक्रवारी मुंबईत मंत्रालय परिसरात आले. तिथे त्यांनी मंत्रालयात जाण्याचा प्रवेश केला. पण त्यांना मंत्रालयात आत प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे त्यांनी मंत्रालयाच्या गेटसमोरच कीटनाशके पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांना पत्र
सुभाष जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहून आपली व्यथा मांडली होती. त्यामध्ये आपल्यासोबत कशाप्रकारे अन्याय झाला, याची व्यथा मांडली होती. आरोपींनी आपल्याला व कुटुंबियांना मारहाण करुन, अर्धनग्न करुन जमीन बळकावली, असा आरोप त्यांनी केला होता. या पत्राची प्रत देखील आता समोर आली आहे.
संबंधित बातम्या :