सतत मोबाईल पाहू नको, भावाने सिम काढले, डोंबिवलीत बहिणीची आत्महत्या
मोबाईल जास्त वेळ पाहू नको असे भावाने सांगितल्याचा राग मनात धरुन 18 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना डोंबिवली शहरात घडली आहे. मयत किरण सहानीचा 22 वर्षीय भाऊ विक्रम सहानी याने दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
डोंबिवली : सतत मोबाईल पाहत बसू नकोस, असं सांगून भावाने फोनमधील सिम कार्ड काढलं. त्यामुळे व्यथित झालेल्या बहिणीने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरात (Thane Dombivali Crime News) हा प्रकार घडला आहे. किरण सहानी असं 18 वर्षीय मयत मुलीचं नाव आहे. कुटुंबीय गावी गेल्यामुळे किशोरवयीन बहीण आणि तिचा 22 वर्षांचा भाऊ अशी दोघंच भावंडं घरी होती. त्यावेळी मोबाईल (Mobile) पाहण्यावरुन दादा दटावल्यानंतर बहिणीने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप आहे.
काय आहे प्रकरण?
मोबाईल जास्त वेळ पाहू नको असे भावाने सांगितल्याचा राग मनात धरुन 18 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना डोंबिवली शहरात घडली आहे. मयत किरण सहानीचा 22 वर्षीय भाऊ विक्रम सहानी याने दिलेल्या माहितीनुसार रामनगर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
डोंबिवली पूर्वेतील शेलार नाका परिसरात त्रिमूर्ती नगरमध्ये सहानी कुटुंब वास्तव्यास आहे. घरातील इतर सदस्य उत्तर प्रदेशातील आपल्या मूळ गावी गेली असल्याने घरात विक्रम आणि किरण ही दोघंच भावंडं होती.
मोबाईल पाहण्यावरुन भाऊ ओरडला
विक्रम घरुन ऑनलाईन काम करत होता. बुधवारी दुपारी त्याने बहीण किरणला मोबाईल जास्त वेळ पाहू नको, असं सांगत मोबाईल फोनमधील सिमकार्ड काढून घेतलं. त्यावेळी किरण पाणी भरत होती.
पाणी भरून वाहू लागल्याने किरण कुठे गेली, हे पाहण्यासाठी विक्रम गेला असता एका खोलीत किरणने गळफास लावून घेतल्याचे त्याला आढळून आले. शेजाऱ्यांच्या मदतीने त्याने किरणला खाली उतरवत शास्त्रीनगर रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.