कल्याण डोंबिवली : बायकोसोबत हौस मौज करण्यासाठी पैसे कमी पडतात, म्हणून महागड्या बाईक्स चोरी करुन विकणाऱ्या नवऱ्याला बेड्या पडल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरात हा प्रकार उघडकीस आला आहे. सीसीटीव्हीच्या सहाय्याने चोरट्याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी दीपक सलगरे हा आपल्या एका साथीदारासह महागड्या दुचाकी चोरी करायचा, त्यानंतर त्या फायनान्स कंपन्यांकडून आणल्या असल्याचे भासवून गरजूंना स्वस्त दरात विकायचा.
आरोपीने काही दुचाकी भंगारवाल्याला विकल्या होत्या. भंगारवाल्याने त्या तोडल्या. अखेर या टोळीचा पर्दाफाश करण्यात मानपाडा पोलिसांना यश आलं आहे. दीपक सलगरे याच्यासह 6 जणांना अटक करण्यात आली आहे.
कल्याण डोंबिवली परिसरातील दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये काही दिवसांपासून वाढ झाली आहे. पोलिस या चोरट्याच्या मागावर होते. कल्याण परिमंडळ 3 मध्ये या दुचाकी चोरट्याचा शोध घेण्यासाठी डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पथके स्थापन करण्यात आली होती. मानपाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांच्या आदेशानंतर मानपाडा पोलिसांच्या पथकाने ज्या परिसरात दुचाकी चोरी झालेल्या आहेत, त्या परिसरातील सीसीटीव्ही तपासून पाहिले. तसेच भंगाराच्या दुकानावर देखील निगराणी ठेवली.
संशयितांवर बारीक नजर ठेवून पोलिसांनी दीपक सलगरे या चोरट्याला अंबरनाथ येथील पालेगाव येथे सापळा रचून अटक केली. दीपक हा पेशाने हजाम आहे. त्याने आपल्या साथीदारांसोबत आजपर्यंत मानपाडा, कोळसेवाडी, विठ्ठल वाडी, अंबरनाथ, नारपोली, उल्हासनगर आणि कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोटरसायकल चोरल्याचे उघड झाले आहे.
अंबरनाथ पालेगाव येथे राहणारा दीपक सलगरे याने बायकोसोबत मौजमजा करण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने मोटरसायकल चोरी सुरु केली होती. दीपक बाईक चोरी करायचा. साथीदार राहुल डावरे याच्या मदतीने त्या बाईक तो ग्राहकांना स्वस्त दराचे आमिष दाखवून विकायचा. या गाड्या फायनान्स कंपनीमधून खेचून आणल्या आहेत, असे ग्राहकांना खोटं सांगून चोरीच्या गाड्या त्यांच्या माथी मारत होता.
काही गाड्या त्याने भंगार व्यवसाय करणाऱ्या चिनमून चौहान उर्फ बबलू याला देखील विकल्या. बबलू या गाड्या स्क्रॅप करून त्या धर्मेंद्र चौहान, समशेर खान, भैरवसिंग खरवड यांच्यामार्फत इतरांना विकत होता. पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात अखेर यश मिळवले.
पोलिसांनी या प्रकरणी दीपक सलगरे याच्यासह सहा जणांना अटक केली आहे. मानपाडा पोलिसांनी 17 दुचाकी, 23 दुचाकींचे इंजिन आणि इतर पार्ट्स, एक कटर मशीन असा आठ लाख 24 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्यांनी याआधी देखील इतर ठिकाणी चोरी केली असल्याचा संशय पोलिसांना असून पुढील तपास मानपाडा पोलिस करत आहेत.
कल्याण डीसीपी सचिन गुंजाळ यांनी नागरिकांनी स्वस्त दुचाकीचा आमिषाला बळी पडून चोरी केलेल्या दुचाकी विकत घेऊ नये, असं आवाहन नागरिकांना केलं आहे. अन्यथा इथून पुढे अशा दुचाकी विकत घेणाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा दिला आहे.
रेणुका शिंदे-सीमा गावितला फाशीच हवी, राज्य सरकार ठाम, आजन्म कारावासाविषयीचं वक्तव्य मागे
पुण्यात दोघांचा एकाच झाडाला गळफास, तरुणीचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर
शारीरिक संबंधानंतर तरुणाकडून ब्लॉक, चिडलेल्या युवतीचं टोकाचं पाऊल