कल्याण : गेल्या चार वर्षांपासून मेल-एक्सप्रेसमध्ये मोबाईल चोरी (Mobile Theft) करणाऱ्या चोरट्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे. कल्याण रेल्वे स्थानकात (Kalyan Railway Station) पोलिसांनी या चोरट्याला पकडले. तो विशेष करुन महिला प्रवाशांना लक्ष्य करत होता. अखेर या चोराला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. शुभम सानप असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 9 महागडे मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. कल्याण जीआरपी पोलिसांकडून चोरी गेलेल्या वस्तूंचा तपास जोराने सुरु आहे. चोरी गेलेले मोबाईल ट्रेस करण्याचे काम सुरु आहे. मेल एक्सप्रेसमधून चोरीला गेलेल्या एक मोबाईलचे ट्रेसिंग सुरु असताना हा मोबाईल अकोल्यातील (Akola) एक व्यक्ती वापर असल्याची माहिती समोर आली.
कल्याण जीआरपीच्या पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने आणि प्रवीण कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्यातून त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. या व्यक्तीने सांगितले की शुभम सानप नावाच्या तरुणाकडून त्याने मोबाईल घेतला आहे.
पोलिस पथक शुभम सानपच्या पुण्यातील पत्त्यावर पोहचले. तो पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यामुळे पोलिसांचे एक पथक त्याच्या शोधात होते. पोलिसांना माहिती मिळाली की, शुभम हा काही कामानिमित्त कल्याणला येणार आहे. तेव्हा सापळा रचून पोलिसांनी शुभमला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी पाच मोबाईल हस्तगत केले आहेत. पुढील तपासात आणखीन चार मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. शुभमकडून एकूण 9 मोबाईल हस्तगत केले आहेत.
धक्कादायक म्हणजे 2018 ते 2022 या काळात पुणे आणि मुंबई दरम्यान मेल एक्सप्रेस गाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल शुभम चोरी करत होता. याचा कधीही सुगावा लागला नाही. विशेष करुन शुभम महिलांना लक्ष्य करायचा. आत्ता त्याचे बिंग फुटल्यावर त्याने आत्तापर्यंत किती चोऱ्या केल्या आहेत, याची माहिती समोर येणार आहे.
संबंधित बातम्या :
Kalyan Crime : कल्याण रेल्वे स्थानकात महिलेला मोबाईल हिसकावून पळणारे चोरटे गजाआड
कल्याण रेल्वे स्थानकात चाकूचा धाक दाखवून प्रवाशाला लुबाडले, रेल्वे पोलिसांची कारवाई
मोबाईल खेचून पळाला, अन पोलिसांच्या जाळ्यात सापडला!, उल्हासनगरात चोरटा अटकेत