VIDEO | कल्याणच्या सिग्नलवर दोघा तरुणांमध्ये राडा, कार चालकाने दुसऱ्याला फरफटत नेलं
सिग्नल सुटला असता कार चालकाने समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला चक्क काही अंतरावर फरफटत नेले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याच वेळी वाहतूक पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे कार शोधून काढत गुन्हा दाखल केला
कल्याण : एका तरुणीसोबत प्रेम प्रकरण असल्याच्या संशयातून दोघा जणांमध्ये राडा झाला. भर चौकात दोघांमध्ये आधी वाद झाला. नंतर हा वाद इतक्या विकोपाला गेला, की कार चालकाने गाडीसमोर उभं राहून भांडणाऱ्या दुसऱ्या तरुणाला गाडीसोबत फरफटत नेले. कल्याण (Kalyan) पश्चिमेतील आधारवाडी चौकात हा अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा थरार मोबाईल कॅमेरात कैद झाला असून व्हिडिओ (Video) चांगलाच व्हायरल झाला आहे. वाहतूक पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली आहे, मात्र शहर पोलीस या प्रकरणात काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
काय आहे प्रकरण?
कल्याण पश्चिमेतील आधारवाडी चौकात सिग्नल लागला होता. वाहन चालक सिग्नल ग्रीन होण्याच्या प्रतिक्षेत होते. इतक्यात बाईकस्वार व्यक्ती एका कार समोर उभा राहिला आणि त्याने कारवर मारायला सुरूवात केली. हे दृश्य एका नागरिकाने पाहिले आणि काही अनुचित प्रकार घडू शकतो, या संशयातून त्याने हा प्रकार मोबाईलमध्ये कैद करण्यास सुरुवात केली.
कारसोबत फरफटत नेलं
काही वेळाने सिग्नल सुटला असता कार चालकाने समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला चक्क काही अंतरावर फरफटत नेले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याच वेळी वाहतूक पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे कार शोधून काढत गुन्हा दाखल केला. प्रवीण चौधरी असं या कार चालकाचं नाव आहे.
प्रेमसंबंधांचा संशय
प्रवीणचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याचे संशय त्रिवेशला आहे. नवी मुंबई येथे राहणारा प्रवीण हा या तरुणीला भेटण्यासाठी कल्याणमध्ये आल्याचा संशय त्रिवेशला आला. म्हणून त्याने आधारवाडी चौकात अडवून वाद घातला.
या प्रकरणी वाहतूक पोलिसांनी प्रवीण विरोधात कारवाई केली आहे. मात्र शहर पोलिसांनी देखील कारवाई केली पाहिजे होती . हा प्रकार खडकपाडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत घडला असून पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पाहा व्हिडीओ :
VIDEO | कल्याणच्या सिग्नलवर दोघा तरुणांमध्ये राडा, कार चालकाने दुसऱ्याला फरफटत नेलं pic.twitter.com/77ZtmTr7vj
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 4, 2022
संबंधित बातम्या :
Nagpur Video | कपड्यांवर पेट्रोलचे थेंब उडाल्याने वाद, पंपावरील महिला कर्मचाऱ्यांची तरुणीला मारहाण
चायनिजच्या गाडीवर गल्ल्यावरुन राडा, पाच जणांची बेदम मारहाण, भिवंडीत तरुणाचा मृत्यू
आजीचा उपचारादरम्यान मृत्यू, दारु पिऊन नातवाचा पुण्यातील रुग्णालयात राडा, डॉक्टरांना मारहाण