मिरा भाईंदर : फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी तक्रारदाराकडून लाच स्वीकारणाऱ्या दोघा पोलीस अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. या दोन वेगवेगळ्या ट्रॅपमध्ये मीरा रोड येथील पोलीस उपनिरीक्षकांच्या दुकलीने अडीच लाखांची मागणी तक्रारदारांकडे केली होती. या घटनेने खाकी वर्दीला लाचखोरीचा ‘डाग’ लागला आहे.
काय आहे प्रकरण?
फसवणुकीच्या प्रकरणात अटक टाळण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी करुन, तडजोडीअंती अडीच लाख रुपयांची सेटलमेंट करुन अखेर 50 हजारांची लाच स्वीकारणारे मीरा रोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोविंद एकीलवाले आणि प्रकाश कांबळे यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रात्री ताब्यात घेतले. मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती एसीबीने दिली.
गाडीत लाच स्वीकारुन पोलिसांची धूम
मीरारोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेल्या तक्रारदाराकडून या पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक गोविंद एकीलवाले (32) व प्रकाश कांबळे (31) या दुकलीने अटक थांबवण्यासाठी अडीच लाखांची लाच मागितली. त्यातील 50 हजारांचा पहिला हफ्ता दोन्ही पोलिसांनी मीरा रोड पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर खासगी गाडीत स्वीकारला. त्यानंतर हे पैसे एजंट सुकेश कोटियन ऊर्फ अण्णा याच्याकडे देऊन लाचखोर पोलिसांनी ठाण्याकडे धूम ठोकली.
दहा लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका तक्रारदाराविरुद्ध शहाबुद्दीन पठाण यांनी फसवणुकीबाबत केलेल्या तक्रार अर्जाची चौकशी मीरा रोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोविंद एकीलवाले करत होते. त्याच अर्जाच्या अनुषंगाने तक्रारदाराविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यात त्यांना अटक करु नये, यासाठी एकीलवाले यांनी तक्रारदाराकडे तब्बल दहा लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कांबळे यांनीही एकीलवालेंना प्रोत्साहित केल्याची तक्रार ठाणे एसीबीकडे दाखल झाली होती. या अनुषंगाने एसीबीने पडताळणी केली असता एकीलवालेंनी तक्रारदाराकडे रक्कम न सांगता लाचेची मागणी केली. त्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी पुन्हा एसीबीने पडताळणी केली. त्यावेळी तक्रारदाराकडे पुन्हा अडीच लाखांची मागणी केली. त्यावेळी उपनिरीक्षक कांबळे यांनीही ही लाचेची रक्कम देण्यासाठी प्रोत्साहित करुन ती 29 नोव्हेंबर रोजी स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.
लाचलुचपत प्रतिबंधक ‘धूम’ विभागाचे पोलीस निरीक्षक उत्तम माने यांच्या पथकाने ठाण्यातील कोर्टनाका परिसरात असलेल्या पॅव्हेलियन हॉटेलजवळून एकीलवाले याला अटक केली. तर कांबळे याला मीरा रोड येथील घरातून ताब्यात घेतले. पैसे घेणाऱ्या फरार सुकेश कोटियन उर्फ अण्णा यांचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती एसीबीने दिली.
19 वर्षीय तरुणी रस्त्यात मृतावस्थेत, शेजारी रक्तरंजित चाकू आणि विषाची बाटली, प्रियकर ताब्यात
गरोदर असल्याचं सांगून लग्नाचा तगादा, पण प्रेयसीला गर्भाशयच नव्हतं, प्रियकराने काटा
प्रियकराचा नवऱ्यावर हल्ला, बचावासाठी मध्ये पडलेली विवाहित प्रेयसी मृत्युमुखी, कोर्टाचा मोठा निकाल