वसईत बंद फ्लॅट हेरुन घरफोडी, बिहारी टोळीतील सहा जण जेरबंद, चोरीचा माल घेणारा पालघरमध्ये सापडला
ही टोळी बंद घरं हेरुन, कंटावनीच्या सहाय्याने दाराची कडी-कोयंडा तोडायचे. घरात प्रवेश करून, आतील सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम घेऊन फरार व्हायचे.
वसई : वसई हद्दीत बंद घरावर पाळत ठेवून, दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत आंतरराज्य बिहारी टोळीचा भांडाफोड करण्यात माणिकपूर पोलिसांना यश आले आहे. या टोळीतील 6 सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 6 लाख 12 हजार 900 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या टोळीने वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यातील 3 गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
अभिषेक कामेश्वर सिंग (वय 24), मोहम्मद तुफेल मोहम्मद जलाल (वय 26), रणजित दशरथ सहानी (वय 38), अधिशकुमार अमोल यादव (वय 22), बिरु रामविलास पासवान (वय 26) असे बिहारी टोळीतील अटक सराईत गुन्हेगारांची नावं असून हे सर्व जण बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील सदरसिटी परिसरातील राहणारे आहेत. तर यांनी चोरीचा माल ज्याला विकला होता तो पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील संतोष भिवा पाटील (वय 46) यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
ही टोळी बंद घरं हेरुन, कंटावनीच्या सहाय्याने दाराची कडी-कोयंडा तोडायचे. घरात प्रवेश करून, आतील सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम घेऊन फरार व्हायचे. माणिकपूर पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही, मोबाईल लोकेशन, गुप्त बातमीदाराची माहिती यांच्या आधारे परिसरात पाळत ठेवून या आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. त्यांची चौकशी केली असता त्यांनी माणिकपूर पोलीस ठाणे हद्दीत दाखल तीन गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून 6 लाख 12 हजार 900 रुपये किमतीच्या 157 ग्रॅम सोन्याच्या आणि 510 ग्रॅम चांदीच्या वस्तू जप्त केल्या आहेत.
पुण्यातील हडपसरमध्ये बंगल्यात घरफोडी
दरम्यान, पुण्यातील हडपसरसारख्या गजबजलेल्या भागातील बंगल्यात घरफोडी झाल्याची धक्कादायक घटना गेल्या महिन्यात उघडकीस आली होती. यामध्ये 88 लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची माहिती आहे. विवेक वसंतराव चोरघडे यांचा शेवाळ वाडीत बंगला आहे. त्यांचा शेतीचा व्यवसाय आहे. 9 ऑगस्टला विवेक चोरघडे आपल्या कुटुंबीयांसह दक्षिण भारत फिरायला गेले होते. 19 ऑगस्टला ते पुण्यात परतले. तेव्हा त्यांना घरात चोरी झाल्याचं लक्षात आलं. त्यात जवळपास 155 तोळे सोनं, 2 किलो चांदी, साडेसहा लाख रुपयांचे विदेशी चलन आणि 40 हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याचा दावा करण्यात आला आहे.
लोणावळ्यात डॉक्टरांच्या घरात सशस्त्र दरोडा
दुसरीकडे, लोणवळ्यात वरिष्ठ डॉक्टरांच्या घरात सशस्त्र दरोडा पडल्याचा धक्कादायक जून महिन्यात समोर आला होता. डॉ हिरालाल खंडेलवाल आणि त्यांच्या पत्नीला चाकूचा धाक दाखवून हात-पाय बांधून सहा दरोडेखोरांनी चोरी केली होती. दरोडेखोर दोरखंडाने खाली येताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. त्यानंतर महिनाभराने पोलिसांनी मुंबईसह मध्य प्रदेशातून १५ जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या होत्या.
पुणे जिल्ह्यात लोणावळा परिसरातील प्रधान पार्क भागात डॉ हिरालाल खंडेलवाल आणि त्यांची पत्नी विजया खंडेलवाल राहतात. दरोडेखोरांनी खंडेलवाल दाम्पत्याच्या घरात प्रवेश करुन त्यांचे हात-पाय बांधले आणि सशस्त्र दरोडा टाकला होता. आरोपी मुंबईतील फिल्मसिटीमध्ये काम करणारे मजूर असल्याचं समोर आलं होतं. त्यांच्याकडून तीस लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला होता.
संबंधित बातम्या :
पुण्यात हडपसरमध्ये बंगल्यात चोरी, 155 तोळे सोन्यासह 88 लाखांचा ऐवज चोरीला
CCTV VIDEO | लोणवळ्यात डॉक्टरांच्या घरात सशस्त्र दरोडा, दाम्पत्याला बांधून 66 लाखांची लूट