आधी विवाहितेचा मृतदेह, आता वसईतील त्याच बीचवर पुरुषही मृतावस्थेत, हातावर नाव गोंदवलेलं
वसई पोलिसांनी पुरुषाचा मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदन करण्यासाठी पाठवून दिला आहे. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.
वसई : वसईच्या किल्ला बंदर समुद्र किनारी विवाहितेचा मृतदेह सापडल्याची घटना ताजी असतानाच आता त्याच बीचवर एका अज्ञात पुरुषाचाही मृतदेह सापडला आहे. काल (बुधवारी) सायंकाळी हा मृतदेह बेवारस अवस्थेत सापडला. मृतदेहाच्या हातावर निलेश असं नाव गोंदलेलं असून अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. गेल्याच रविवारी 30 वर्षीय ममता पटेल यांचा मृतदेह या किनाऱ्यावर सापडला होता. या बाबतही पोलीस तपास करत असताना आणखी एक मृतदेह सापडल्याने गूढ अधिकच वाढले आहे.
वसई पोलिसांनी पुरुषाचा मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदन करण्यासाठी पाठवून दिला आहे. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे. मात्र त्याची हत्या झाली, त्याने आत्महत्या केली, की अपघात झाला, याचा आता पोलीस तपास करत आहेत. पुरुषाची ओळख पटवण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. त्याचप्रमाणे विवाहितेचा मृतदेह सापडल्याच्या चार दिवसांनी अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडला आहे, त्यामुळे या दोन घटनांचा काही संबंध आहे का, याचा तपास पोलीस करणार आहेत.
वसईतील बीचवर नवविवाहितेचा मृतदेह
दरम्यान, मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या 30 वर्षांच्या महिलेचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना गेल्या रविवारीच (११ जुलै) उघडकीस आली होती. वसईच्या किल्ला बंदर समुद्र किनाऱ्यावर ममता पटेल हिचा मृतदेह सापडला होता. ती चार दिवसांपासून बेपत्ता होती.
अवघ्या दोन महिन्यांपूर्वी विवाह
ममता पटेल वसईच्या एव्हरशाईन परिसरात राहत होती. ती मूळ गुजरातमधील नवसारी येथील रहिवासी होती. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी तिचा विवाह झाला होता.
मॉर्निंग वॉकला गेल्यापासून बेपत्ता
गेल्या बुधवारी (७ जुलै) सकाळी सहा वाजता ममता मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडली होती. मात्र त्यानंतर ती बेपत्ता झाली होती. याबाबत तुलिंज पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती. मात्र चार दिवसांनंतर तिचा मृतदेह वसईच्या किल्ला बंदर समुद्र किनाऱ्यावर सापडल्याने एकच खळबळ उडाली होती.
संबंधित बातम्या :
मॉर्निंग वॉकहून परतलीच नाही, वसईतील बीचवर नवविवाहितेचा मृतदेह आढळला
मुंबईत 61 वर्षीय महिलेची आत्महत्या, सातव्या मजल्यावरुन उडी घेत आयुष्य संपवलं
(Vasai Unidentified Man found dead at Kille Bandar Beach)