मुंबई : मुंबई ही स्वप्न नगरी आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक जण स्वप्न उराशी बाळगून नशीब आजमावायला येतात. मात्र पश्चिम बंगालमधून मुंबईत मॉडेलिंगमध्ये करिअर करायला आलेल्या एका अल्पवयीन मुलीचे स्वप्न तर पूर्ण झालं नाही, उलट तिच्यावर अत्याचार झाला. याची तक्रार दाखल करुनही तिला न्याय मिळाला नाही. पीडित मुलीला न्याय मिळावा म्हणून मुंबई उच्च न्यायालयात हेबियस कार्पस (पीडितेला कोर्टात प्रत्यक्ष हजर करण्याबाबत) याचिका दाखल करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
अॅडव्होकेट नवीन चोमल यांनी पीडित मुलीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पीडिता मॉडेलिंहग क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी मुंबईत आली होती. मात्र तेव्हा तिची भेट साकीनाका परिसरात राहणाऱ्या एका विवाहित व्यक्तीसोबत झाली. त्याने मुलीला मदत करण्याचं आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केले, असा आरोप पीडित मुलीने केला आहे.
ब्लॅकमेल करुन भावाकडूनही शोषण
मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणाऱ्या वकील चोमल यांच्या म्हणण्याप्रमाणे आरोपीने पीडित मुलीसोबत लैंगिक शोषण करतानाचा व्हिडीओ बनवून घेत आपल्या भावाला पाठवून दिला होता. या व्हिडीओच्या आधारे ब्लॅकमेल करत आरोपीच्या भावाने सुद्धा पीडितेचा लैंगिक शोषण केल्याचा आरोप मुलीने केला आहे.
पीडितेसोबत सुरु असलेला अत्याचार इथेच थांबला नाही. हायकोर्टात दाखल याचिकेत असा आरोप आहे की जेव्हा तिने याबाबत आरोपींच्या वडिलांकडे तक्रार केली, तेव्हा त्यांनी सुद्धा तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
पीडित मुलीने या प्रकरणात स्थानिक साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या तक्रारींची योग्यरित्या दखल घेतली गेली नाही, आरोपींवर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर पीडित मुलीने अॅडव्होकेट नवीन चोमल यांना संपर्क केला.
पीडितेचे अपहरण केल्याचा आरोप
अॅड. चोमल यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा आरोपींना माहिती मिळाली की पीडित मुलगी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे, त्यांनी तिचे अपहरण केल्याचा आरोप आहे. पीडित मुलगी बेपत्ता असल्याचे गूढ अजूनही कायम आहे. हायकोर्टात दाखल याचिकेत अशी मागणी करण्यात आली आहे की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी एका महिला आयपीएस अधिकाऱ्यामार्फत करण्यात यावी. त्याच बरोबर पीडितेला न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित करण्याचा निर्देश न्यायालयाने संबंधितांना द्यावा.
संबंधित बातम्या :
कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर उस्मानाबादेत महिलेचा मृत्यू, नातेवाईकांची रुग्णालयात तोडफोड
पिंपरीतील कुख्यात रावण टोळीच्या गुंडांच्या मुसक्या आवळल्या, साताऱ्यातून सहा जणांना बेड्या
महाराष्ट्र बंदवेळी शिवसैनिकांची रिक्षा चालकाला मारहाण, ठाणे उपमहापौरांच्या पतीसह पाच जणांवर गुन्हा