मुंबई : प्रख्यात बॉलिवूड अभिनेत्री प्रिया राजवंश (Priya Rajvansh) यांचे नाव मनोरंजन विश्वातील सौंदर्यवान अभिनेत्रींच्या यादीत गणले जात असे. अभिनेते देव आनंद यांचे बंधू चेतन आनंद (Chetan Anand) यांच्यासह त्या लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होत्या. 27 मार्च 2000 रोजी वयाच्या 63 व्या वर्षी प्रिया राजवंश यांची गळा दाबून हत्या करण्यात आली. चेतन आनंद यांच्या मुलांना प्रिया राजवंश हत्या प्रकरणात अटक करण्यात आली होती.
सिमल्यामध्ये जन्म
प्रिया राजवंश यांचे मूळ नाव वीरा सुंदर सिंग. त्यांचा जन्म 30 डिसेंबर 1936 रोजी सिमल्यामध्ये झाला. सिमल्याच्या गेईटी थिएटरमध्ये इंग्लिश नाटकात त्यांनी लहानपणी काम करायला सुरुवात केली. वडिलांच्या कामामुळे पुढे त्या लंडनला गेल्या आणि तिथेच त्यांचे पुढील शिक्षण सुरु झाले. लंडनच्या एका फोटोग्राफरने काढलेला त्यांचा फोटो हिंदी फिल्म इंडस्ट्रीत पोहोचला. 1962 मध्ये ठाकूर रणबीर सिंह यांनी प्रिया यांचा फोटो पाहिला. हा फोटो त्यांनी देव आनंद आणि विजय आनंद यांचे बंधू चेतन आनंद यांना दाखवला.
प्रिया राजवंश यांचा फोटो चेतन आनंद यांच्या पसंतीस उतरला. त्यांनी प्रिया यांना हकीकत (Haqeeqat – 1964) सिनेमाची ऑफर दिली. हा सिनेमा प्रचंड गाजला. भारतीय चित्रपटांच्या इतिहासात हा सर्वोत्तम युद्धपटांपैकी एक मानला जातो.
चेतन आनंदसोबत प्रेमसंंबंध
चेतन आनंद त्यावेळी नुकतेच आपल्या पत्नीपासून विभक्त झाले होते. प्रिया राजवंश आणि चेतन यांच्या वयात बरंच अंतर होतं. मात्र दोघांची मनं जुळली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर प्रिया राजवंश यांनी केवळ चेतन आनंदच्या चित्रपटांमध्येच काम करायला सुरुवात केली. कथा-पटकथेपासून गीत, पोस्ट प्रॉडक्शन यासारख्या विविध पैलूंमध्ये त्या लक्ष घालायला लागल्या. प्रिया राजवंश यांना मुख्य भूमिकेत ठेवूनच चेतन आनंद सिनेनिर्मिती करु लागले. मात्र अभिनयाचे गुण असूनही इंग्रजाळलेल्या उच्चारांमुळे त्या भारतीय प्रेक्षकांच्या मनात घर करु शकल्या नाहीत.
अभिनेते राजकुमार यांच्यासोबत हीर रांझा, हिंदुस्थान की कसम, तसेच हसते जखम, राजेश खन्नासोबतचा कुदरत, देव आनंद सोबतचा साहेब बहादूर असे अनेक चित्रपट गाजले. 1985 मध्ये आलेल्या हाथोंकी लकीरे या चित्रपटानंतर त्या मनोरंजन विश्वापासून दूर गेल्या.
चेतन आनंद यांचा मृत्यू
1997 मध्ये चेतन आनंद यांचा मृत्यू झाला. त्यानंतर चेतन यांच्या मालमत्तेचा काही भाग प्रिया राजवंश यांच्याही वाट्याला आल्या. मात्र यामध्ये चेतन आनंद यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेली मुलंही भागीदार होते.
27 मार्च 2000 रोजी जुहू भागातील चेतन आनंद यांच्या रुईया पार्क बंगल्यात प्रिया राजवंश यांची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. चेतन आनंद यांचे पुत्र केतन आनंद आणि विवेक आनंद यांना पोलिसांनी हत्या प्रकरणात अटक केली. यासोबत त्यांचे कर्मचारी माला चौधरी आणि अशोक चिन्नस्वामी यांनाही बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. चेतन आनंद यांची प्रॉपर्टी बळकावण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप झाला.
प्रिया राजवंश यांच्या हस्ताक्षरातील चिठ्ठ्या
प्रिया राजवंश यांच्या हस्ताक्षरातील चिठ्ठ्या आणि चेतन आनंद यांचे बंधू विजय आनंद यांना लिहिलेले पत्र या प्रकरणाच्या तपासात महत्त्वपूर्ण ठरली. ही पत्र कोर्टात पुरावे म्हणून सादर करण्यात आली. मृत्यूपूर्वी त्यांच्या मनात असलेली भीतीची भावना यावर प्रकाशझोत टाकत होती. जुलै 2002 मध्ये चारही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र कोर्टाच्या आदेशांविरोधात या चौघांची याचिका बॉम्बे हायकोर्टाने 2011 मध्ये स्वीकारली.
संबंधित बातम्या :
Silk Smitha | मैत्रिणीला फोन करुन बोलावलं, पण ती येण्याआधीच गळफास घेतला, सिल्क स्मिताचं वादळी आयुष्य