मुंबई एपीएमसी मार्केटमधील परप्रांतीयांची नोंद नाही, अनेक दुर्घटना घडूनही प्रशासन सुस्त, मार्केटची सुरक्षा रामभरोसे
राज्याबाहेरुन येणाऱ्या परप्रांतीयांची नोंद ठेवण्याचे आदेश नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे आता राज्यात बाहेरुन कोण, कोठून आणि कशासाठी आले आहे याची नोंद ठेवण्यात येणार आहे.
मुंबई : राज्याबाहेरुन येणाऱ्या परप्रांतीयांची नोंद ठेवण्याचे आदेश नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे आता राज्यात बाहेरुन कोण, कोठून आणि कशासाठी आले आहे याची नोंद ठेवण्यात येणार आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ असणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला गुन्हेगारांचा विळखा पडला आहे. या परिसरात गांजा, गुटखा, दारुच्या अवैध विक्रीसह खंडणी, चोरी, खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी सापडले आहेत.
आतापर्यंत बांगलादेशी नागरिकांचे आश्रयस्थान असलेल्या मार्केटमध्ये दोन महिन्यांपूर्वी गाडीमधून स्फोट घडवून आणण्यात आला होता. बाहेरील गुंडानी येऊन व्यापाऱ्याला मारहाण केली होती. पण यानंतरही येथील सुरक्षा व्यवस्थेमध्ये आणि प्रशासनाच्या गलथान कारभारामध्ये काहीही फरक पडलेला नाही, असेत दिसून येत आहे.
एपीएमसीवर गुन्हेगारी टोळ्यांचेही लक्ष
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वर्षाला जवळपास 10 हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. इथे 1 लाख नागरिकांना प्रत्यक्ष आणि 5 लाख नागरिकांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला आहे. देशाच्या प्रत्येक राज्यातून आणि विदेशातून कृषी माल या मार्केटमध्ये विक्रीसाठी येतो. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख आणि रोज होणारी करोडो रुपयांची उलाढाल यामुळे एपीएमसीवर गुन्हेगारी टोळ्यांचेही लक्ष असते. नवी मुंबईमध्ये गांजा आणि गुटखा विक्रीचे सर्वात मोठे रॅकेट मार्केटमध्ये सुरु आहे.
बाजार समितीची सुरक्षा रामभरोसे
गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये अनेक राज्यातील कामगार येऊन राहतात. त्यांची कोणतीच नोंद संबंधित प्रशासनाकडे नाही. सीसीटीव्ही असून सुद्धा ते काम करत नसल्याने गुन्हेगारांना पकडण्यास पोलिसांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे मुंबई बाजार समितीची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे.
फळ आणि भाजी मार्केटला धर्मशाळेचे स्वरुप
एपीएमसी पोलिसांनी वारंवार पत्र व्यवहार करुन सुद्धा याबाबत व्यापारी अथवा प्रशासन माहिती पुरवत नसल्याचे सांगण्यात येत आहे. चोरी, खून, दरोडे, बनावट नोटा व इतर गंभीर गुन्ह्यांमधील आरोपींना अनेकवेळा मार्केटमधून अटक केली आहे. बाजार समितीच्या फळ आणि भाजी मार्केटला धर्मशाळेचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
परप्रांतीय नागरिकांचे सर्वात मोठे आश्रयस्थान म्हणूनही एपीएमसी मार्केटची ओळख झाली आहे. मात्र असे असताना देखील विनापरवाना वास्तव्य करणाऱ्या परप्रांतीय कामगारांविरोधात काहीही ठोस कारवाई केली जात नाही. त्यामुळे आता तरी मुख्यमंत्र्याच्या आदेशाचे पालन होणार का? असा सवाल बाजार घटक करत आहेत.
सुरक्षा काहीच नाही
वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा, धान्य आणि मसाले अशी पाच मार्केट आहेत. या सर्व पाच घाऊक बाजारावर नियंत्रण येथील बाजार समिती प्रशासक करत आहे. बाजार समिती पाच मार्केटमध्ये व्यवसाय करणाऱ्या जवळपास 5 हजार घाऊक व्यापाऱ्यांकडून दरवर्षी लाखो-कोटी रुपयाचे कर वसूली करते. पण सुरक्षाच्या नावावर काहीच नाही.
हेही वाचा :
नवी मुंबईत सुरक्षा व्यवस्थेचा बट्ट्याबोळ, बच्चे कंपनींसाठी कृत्रिम तलाव झाला स्विमिंग पूल
शामकांत नाईकांच्या हत्येचा तपास योग्य दिशेने व्हावा, मुलाचे नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे निवेदन