व्हॉट्सॲप फोटोवरून दीड महिन्यानंतर झाला गुन्ह्याचा उलगडा, अशा पद्धतीने अडकली जाळ्यात
गुन्हा कितीही लपवला तरी त्याचा कोणत्या कोणत्या माध्यमातून उलगडा होतोच. याचं उत्तम उदाहरण व्हॉट्सॲप फोटोवरून समोर आलं आहे. गेल्या दीड महिन्यांपासून गुन्ह्याचा छडा लावण्यात अपयश आलं होतं. अखेर एक फोटो क्लिक केला आणि सर्वकाही उघड झालं.
मुंबई : मुंबईतील मालाडमध्ये एक कुटुंब अनेक दिवसांपासून त्रस्त झालं होतं. कोणाला सांगताही येत नव्हतं आणि कळतंही नव्हतं. ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याने गुन्हा केल्याची तीळमात्र शंका आली नव्हती. पण अखेर दीड महिन्यानंतर गुन्ह्याचा उलगडा झाला. 59 वर्षीय सुप्रिया जोशी या मालाड वेस्टमधील एसव्ही रोडवरील कुशलगंगा कॉम्प्लेक्समध्ये राहतात. त्यांच्यासोबत तिचे पती 62 वर्षीय पती सुनिल आणि 30 वर्षांची मुलगी प्रियंकाही राहतात. पण घरातील कामाचा ताण पाहता पूर्णवेळ मदतीसाठी एक मोलकरीण ठेवली होती. डोंबिवलीला राहणारी 23 वर्षीय मोलकरीण घरातील सर्व काम नेटाने करायची. साफसफाई आणि जेवण करणं तिचं नित्याचं काम होतं. पती आणि मुलगी बाहेर गेल्यावर सुप्रीया जोशी या मोलकरणीसोबत घरी असायच्या. 5 जानेवारीला प्रियंकाने गळ्यात घालण्यासाठी सोन्याची चैन आणि पेंडन्ट मागितली. पण जेव्हा सुप्रिया यांनी कपाट उघडलं तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. कारण कपाटातील दागिने गायब असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. घरात सर्वत्र शोधाशोध करूनही दागिने काही हाती लागले नाहीत.
“मी आणि मोलकरीण रोज घरी असायचो. मी तिला वारंवार विचारायची की तू दागिने घेतलेत का किंवा कुठे पाहिले का? तेव्हा ती कायम नाही असंच सांगायची. ” असं प्रियंका जोशी यांनी पोलिसांना सांगितलं. साडे चार रुपयांचे दागिने गहाळ झाल्यानंतरही जोशी यांनी कोणताही गुन्हा दाखल केला नाही. दागिने कुठेतरी गहाळ झाल्याच्या भ्रमात होती.
2 फेब्रुवारीला मोलकरणीने जोशी यांना सांगितलं की, माझ्या कुटुंबात लग्न आहे. काम सोडून ती डोंबिवलीला परत गेली. तिने काम सोडलं तरी ती व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जोशी कुटुंबियांच्या संपर्कात होती. “तरुण असल्याने ती सोशल मीडियावर सक्रिय होती. ती कायम फोटो वगैरे पोस्ट करायची.”, असं मालाड पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी सांगितलं.
बुधवारी प्रियंका जोशी या व्हॉट्सॲप ब्राउंझिंग करत होत्या. तेव्हा त्यांची नजर मोलकरणीच्या फोटो स्टेटसकडे गेली. जोशी यांनी तिचा फोटा झूम करून पाहिला तर त्यांना धक्काच बसला. मोलकरणीच्या बहिणीच्या गळ्यात प्रियंकाचे गहाळ झालेले दागिने होते. प्रियंका यांनी तात्काळ मुलगी प्रियंकाला फोटो दाखवला आणि शहनिशा करण्यास सांगितलं. तेव्हा तेच असल्याचं कळलं. त्यानंतर जोशी यांनी मोलकरणीला वारंवार फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तिने काही दाद दिली नाही. त्यानंतर थेट पोलीस स्टेशन गाठून मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी कलम 381 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच मोबाईल फोन नंबरच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.