VIDEO | कुर्ला स्टेशनच्या स्कायवॉकवर दोन गर्दुल्ले भिडले, अंमली पदार्थावरुन एकमेकांवर जीवघेणा हल्ला
मध्य रेल्वेवरील कुर्ला स्टेशन परिसरातील स्कायवॉकवर झालेल्या हाणामारीच्या घटनेचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. रात्री एक वाजताच्या सुमारास अंमली पदार्थांवरुन दोघे आपापसात भिडले.
मुंबई : मुंबईतील कुर्ला रेल्वे स्टेशनच्या स्कायवॉकवर दोन गर्दुल्ल्यांमध्ये मारामारीचा गंभीर प्रकार घडला. अंमली पदार्थाची नशा करण्यावरुन दोघांमध्ये आपापसात जुंपली. या जीवघेण्या हल्ल्यात दोघेही तरुण जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेचा रक्तरंजित व्हिडीओ समोर आला आहे.
नेमकं काय घडलं?
मध्य रेल्वेवरील कुर्ला स्टेशन परिसरातील स्कायवॉकवर झालेल्या हाणामारीच्या घटनेचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. यामध्ये दोन तरुण एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. रात्री एक वाजताच्या सुमारास अंमली पदार्थांवरुन दोघे आपापसात भिडले. ते अक्षरशः एकमेकांचा जीव घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
कुर्ला स्कायवॉक गुन्हेगारांचे आश्रयस्थान
नेहरु नगर पोलिसांनी घटनास्थळवरुन दोघांनाही जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवले आहे. कुर्ला स्कायवॉक हे गर्दुल्ल्यांचं आश्रयस्थान बनल्याचं स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे. कुर्ला जीआरपी स्कायवॉकवरील गुन्हे रोखण्यात असमर्थ असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पाहा व्हिडीओ :
ठाण्यात महिलेला मारहाण करणाऱ्या गर्दुल्ल्याला चोप
याआधी, भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी गर्दुल्ल्याला चोप दिल्याचा प्रकार ठाण्यात उघडकीस आला होता. ठाण्यातील मनोरमा नगर परिसरात एका गर्दुल्ल्याने महिलेची छेड काढली होती. त्यानंतर पीडित महिलेने त्याच्या कानाखाली लगावली. त्यामुळे चिडलेल्या गर्दुल्ल्याने महिलेला थेट लाथा बुक्क्यांनी मारहाण केली होती. त्यानंतर तिने भाजपच्या महिला कार्यकर्त्यांकडे धाव घेतली. अखेर संतप्त कार्यकर्त्यांनी गर्दुल्ल्याला मनोरमा नगर परिसरात भर रस्त्यातच चोप दिला होता. महिलांनी चोप दिल्यानंतर गर्दुल्ल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. महिलांची छेड काढणाऱ्यांना सोडले जाणार नाही, त्यांनाही असाच चोप दिला जाईल, असा इशारा भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा मृणाल पेंडसे यांनी दिला.
संबंधित बातम्या :
VIDEO | मोबाईलवर बोलणाऱ्या बाईकस्वाराचा ‘बेस्ट’ला धक्का, बस चालकालाच तरुणाची मारहाण
VIDEO | ठाण्यात महिलेची छेड काढणाऱ्या गर्दुल्ल्याला भाजप महिला कार्यकर्त्यांचा चोप