Mumbai Crime : जुना वाद उफाळून आला, मग कुर्ल्यात जे घडलं ते भयंकर !
जुना वाद उफाळून आला अन् कुर्ल्यात जे घडलं ते भयंकर होतं. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. हल्ली हल्ल्याच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मुंबई / 28 ऑगस्ट 2023 : हल्ली मुंबईत हल्ला आणि हत्येच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. क्षुल्लक वादातून हल्ला करण्याच्या घटना अधिक वाढल्या आहेत. अशीच एक घटना कुर्ला परिसरात घडली आहे. जुन्या वादातून एका 50 वर्षीय व्यक्तीवर हल्ला करत त्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. हल्ला करणाऱ्यांमध्ये एका अल्पवयीन मुलासह किमान 15 जणांचा समावेश आहे. ही घटना कुर्ला पूर्व येथील कुरेशी नगर परिसरात शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी चुनाभट्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. भारतीय दंड संहिता आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत हत्या, हत्येचा प्रयत्न आणि संघटित गुन्हेगारीचे आरोप लावले आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण?
चुनाभट्टी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सिकंदर अली कुरेशी यांचा स्वतःचा लघुउद्योग आहे. शनिवारी रात्री कुरेशी आणि त्यांचे कुटुंबीय धंदा बंद करत होते. यावेळी 15 जणांचा एक गट त्यांच्याजवळ आला. या ग्रुपसोबत कुरेश यांचा वाद सुरु झाला. हळूहळू वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. जमावा कुरेशी यांच्यावर हल्ला करत असताना त्यांचा भाऊ साजिद अली आपल्या भावाला वाचवण्यासाठी मध्ये पडला. यावेळी हल्लेखोरांपैकी एकाने साजिदच्या पोटात धारदार चाकूने वार केले.
कुरेशी कुटुंबातील दोन 16 वर्षीय मुलंही हाणामारीत जखमी झाले. या दोघांना किरकोळ दुखापत झाली असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हाणामारीवेळी तेथे उपस्थित असलेल्या इतर काही कुटुंबातील सदस्यांना आरोपींनी जिवे मारण्याची धमकी दिली. सुदैवाने त्यांना इजा पोहचवली नाही. कुरेशी यांचे याआधी आरोपींसोबत भांडण झाले होते. त्याबाबत कुरेशी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याच रागातून आरोपींनी कुरेशींवर हल्ला केला.
सहा आरोपींना अटक
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी 15 जणांपैकी 6 जणांना अटक केली आहे. आरोपींमध्ये अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे. जैद जावेद सय्यद, फैसल अब्दुल करीम, हलीम हनिफ खान, हारुल अब्दुल कुरेशी, हलिमा खान आणि शिफा खान अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर अकबरुल्ला खान, दिलशाद खान, आवेश कुरेशी, इजाज कुरेशी, साहिल कुरेशी आदी फरार आहेत. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र, चाकू जप्त करण्यात आला आहे.