Mumbai Crime : रात्री फिरायला गेले असताना दोघांमध्ये वाद झाला, मग भररस्त्यातच पतीने पत्नीवर…

पती-पत्नी दोघे फिरायला गेले होते. मात्र अचानक दोघांमध्ये काही कारणातून वाद झाला आणि पुढे भलतंच घडलं.

Mumbai Crime : रात्री फिरायला गेले असताना दोघांमध्ये वाद झाला, मग भररस्त्यातच पतीने पत्नीवर...
वैवाहिक वादातून पतीकडून पत्नीवर हल्ला
Image Credit source: Google
| Updated on: Jul 31, 2023 | 10:12 AM

मुंबई / 31 जुलै 2023 : कौटुंबिक वादातून भररस्त्यात पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना मुंबईतील खार परिसरात घडली आहे. पत्नीवर हल्ला केल्यानंतर पतीने तेथून पळ काढला. या हल्ल्यात महिला जखमी झाली आहे. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या महिलेची प्रकृती स्थिर आहे. पोलीस फरार पतीचा शोध घेत आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक तयार करण्यात आले आहे. पती-पत्नीमध्ये नेमका कोणत्या कारणातून वाद झाला याबाबत अद्याप माहिती मिळून शकली नाही.

काय आहे प्रकरण?

धारावी परिसरात राहणाके हे जोडपे रविवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास 14 व्या रोडवर फिरायला गेले होते. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. यावेळी पतीने स्वतःजवळचा पेपर कटर काढला आणि पत्नीच्या गळ्यावर वार केले. या हल्ल्यात पत्नी जखमी झाली आणि रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडली. यानंतर पती तेथून फरार झाला. रस्त्यावरुन चाललेल्या नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला रुग्णालयात नेले.

पतीकडे पेपर कटर असल्याने त्याने आधीपासूनच या हल्ल्याचा कट रचला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. यामुळे रुग्णालयात महिलेच्या सुरक्षेसाठी एक पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डेटा रेकॉर्ड तपासत आहेत.

पती-पत्नीमध्ये आधीपासून वैवाहिक वाद सुरु आहे. याबाबत दोघे न्यायालयातही गेले होते. यानंतर रविवारी रात्री दोघे फिरायला गेले होते. यावेळी त्यांच्यात पुन्हा वाद झाला. या वादातून पतीने पत्नीवर हल्ला केला. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.