Mumbai Crime : सराफा व्यापाऱ्यांना बोलण्यात गुंतवून लुटायचे, ‘बोल बच्चन’ गँगचा पर्दाफाश
व्यापाऱ्यांना बोलण्यात गुंतवून सोने घेऊन फरार व्हायचे. अखेर या गँगचा पर्दाफाश करण्यास मुंबई पोलिसांना यश आले आहे.
मुंबई / 3 ऑगस्ट 2023 : सराफा व्यापाऱ्यांना बोलण्यात गुंतवून लुटणाऱ्या ‘बोल बच्चन‘ गँगचा पर्दाफाश करण्यास मुंबई पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी गँगमधील दोघांना राजस्थानमधून अटक केली आहे. अल्ताफ फकीर हुसैन आणि जाबीर अली तालिब हुसैन अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. आरोपींनी अशाच प्रकारे चेन्नई, बंगळुरु, कोलकाता, दिल्ली, हैदराबाद येथे सराफा व्यापाऱ्यांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. मुंबईतील काळबादेवी परिसरात एका सराफाला लुटल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपींच्या मुसक्या आवळल्या. यामध्ये आणखी आरोपींचा समावेश आहे का याबाबत पोलीस तपास करत आहेत.
काळबादेवीत सराफा व्यापाऱ्याला लुटल्यानंतर आरोपी अटक
काळबादेवी परिसरातील धनराज स्ट्रीटवर एका सराफा व्यापाऱ्याचा नोकर 225 ग्रॅम सोने घेऊन चालला होता. आरोपींनी त्याला रस्त्यात अडवले. मग एकाने त्याला बोलण्यात गुंतवले, तर दुसऱ्याने त्याच्याकडील सोने हातचलाखीने काढून घेतले. यानंतर आरोपींनी पोबारा केला. सोने चोरीला गेल्याचे लक्षात येताच याप्रकरणी सराफा व्यापाऱ्याने लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
मुंबई पोलिसांनी राजस्थानमधून केले अटक
पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला असता आरोपी राजस्थानमधील अजमेर येथील असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर टिळक मार्ग पोलिसांची एक टीम राजस्थानला रवाना झाली. पोलिसांनी आरोपींचा ठावठिकाणा शोधत सापळा रचून त्यांना अटक केली. दोन्ही आरोपी मूळचे मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत. आरोपींना ताब्यात घेत चौकशी केली असता आरोपी सराईत चोरटे असल्याचे कळले. आरोपी विविध शहरात जाऊन अशा प्रकारे बोलण्यात गुंतवून सराफा व्यापाऱ्यांची लूट करत असल्याचे निष्पन्न झाले.