बोल बच्चन गँगच्या दोघांना बेड्या, मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई, पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडलं
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बोल बच्चन गॅंगच्या दोन आरोपींना अटक केली आहे.
मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बोल बच्चन गँगच्या दोन आरोपींना अटक केली आहे. प्रॉपर्टी सेलच्या पोलीस अधिकाऱ्यांनी ज्या दोन आरोपींना अटक केली आहे ते दोन्ही गर्दीचा फायदा घेऊन आणि समोरच्या व्यक्तीला आपली ओळख दाखवून बोल बच्चन करून फसविण्याचे काम करायचे. हे आरोपी ओळख नसताना ओळखीचं असल्याचं भासवायचे. नंतर संधी साधत चोरी करायचे. त्यांचा तपास करणं पोलिसांपुढे मोठं आव्हान होतं. कारण ते दुसऱ्या व्यक्तींच्या नावावर सीमकार्ड खरेदी करायचे आणि नागरिकांशी संवाद साधायचे. अखेर त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये 26 मार्च 2021 रोजी एक गुन्हा दाखल झाला होता. आरोपींनी आपली ओळख सांगून तक्रारदाराला बोलण्यात गुंतवले. त्यानंतर आरोपी संधी मिळताच तक्रारदाराचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पसार झाले. हे आरोपी दुसऱ्याच्या नावावर सीमकार्ड घेऊन लोकांसोबत बोलायचे. त्यामुळे त्यांना पकडून कारवाई करणं पोलीस अधिकाऱ्यांना कठीण जात होतं.
अखेर आरोपींना बेड्या
संबंधित प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेल मार्फत सुरु होता. तांत्रिक तपासाच्या आधारावर पोलिसांना या गँगच्या प्रमुख आरोपीचा सुगावा लागला. पोलिसांनी मोबाईल नंबर ट्रेसकडून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. संबंधित आरोपी हा सराईत गुन्हेगार असून दिवा शीळफाटा, कल्याण डोंबिवली या भागात लपून बसला होता. अखेर पोलिसांनी त्याला दिवा पूर्वेतून अटक केली.
आरोपी सराईत गुन्हेगार
अटक केलेल्या प्रमुख आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर माटुंगामध्ये लपलेल्या त्याच्या एका साथीदाराला अटक करण्यात आली आहे. या दुसऱ्या आरोपीवर मालाड, पंत नगर, आरसीएफ, मीरा रोड आणि इतर अनेक पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
आरोपींकडून अनेकांच्या फसवणूकीची शक्यता
अटकेतील दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार आसल्याची माहिती पोलीस अभिलेखावरुन समोर आली आहे. मात्र त्यांच्यासोबत इतर आणखी किती आरोपी आहेत? या आरोपींनी आणखी किती लोकांची फसवणूक केली? याचा शोध चेंबूर पोलीस सोबतच गुन्हे शाखेचे अधिकारी करत आहेत (Mumbai Police arrest two people of bol bachchan gang).
हेही वाचा :
सॉफ्टवेअर बनवून देतो म्हणत 40 लाख घेतले, नंतर धूम ठोकली, भाजप आमदाराच्या मुलाची फसवणूक