मुंबई : 90 वर्षांच्या वृद्ध आजीबाईंना कोर्टाने (Mumbai Court News) अखेर दिलासा दिला आहे. आपल्याच मुलानं आपल्याच घरातून हाकलवून लावल्यानं आणि आपल्या मालकी हक्कातून बेदखल केल्याप्रकरणी या वृद्ध महिलेनं आपल्या मुलासह सुनेविरोधात कोर्टात (Mumbai Session Court) दाद मागितली होती. त्याप्रकरणी अखेर या 90 वर्षीय वृद्ध आईला कोर्टाने मोठा दिलासा दिला. तसंच मुलासह या वृद्ध महिलेच्या सुनेलाही कोर्टाने फटकारलं आहे. ही महिला ताडदेव (Tardeo) इथं राहणारी असून कौटुंबिक वादाची ही महिला शिकार झाली होती. या महिलेचा मुलगा आणि सून 60 वर्षांची आहे. त्या दोघांनी मानसिकरीत्या या महिलेचा छळ केला होता. तसंच घरावरील हक्क सोडण्यासाठी तिच्यावर दबाबही टाकला होता. अखेर या वृद्ध महिलेला आपल्या पतीचं घर सोडून मुलगी आणि जावयाच्या घरी जाऊन राहाण्याची वेळ ओढावली होती. पण पतीनं आपल्याला दिलेल्या घराच्या हिश्शातील 50 टक्के वाटा मिळालाच पाहिजे, या मागणीसाठी वृद्ध महिलेनं कोर्टाची मदत घेतली. 2011 साठी याप्रकरणी कोर्टात गेलेल्या महिलेला तब्बल 11 वर्षांनी न्याय मिळालाय.
ज्या घरात ही वृद्ध महिला आपलं अख्खं आयुष्य राहिलं, त्याच घरातून तिचा मुलगा तिला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात होता. ज्या घरात पतीसोबत संसार केला, मुलांना लहानाचं मोठं केलं, त्याच घरातून बेदखल होण्यासाठी मुलगा दबाब आणत असल्यानं महिला प्रचंड दुःखी आणि अस्वस्थ झाली होती. या घराशी भावनात्मकदृष्ट्याही वृद्ध महिला जोडली गेलेली होती. अशा स्थितीत तिला घरातून काढून टाकण्याचा प्रयत्न करणं, किंवा तिला घरावरील हक्क सोडण्यासाठी धमकावणं, हे चुकीचं असल्याचं कोर्टाच्या निर्दशान आलं. त्यानुसार कोर्टानं या महिलेला घरातील 50 टक्के वाटा कायम असल्यावर शिक्कामोर्तब करत मुलगा आणि सुनेला फटकारलंय. घरावर 50 टक्के वाटा असूनही मुलानं आपल्याला घरातूर बाहेर काढत मुलगी आणि जावयाच्या घरात राहण्यास भाग पाडलं, असा आरोप कोर्टात या महिलेनं केला होता.
2000 साली या वृद्ध महिलेच्या पतीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या महिलेचा मुलगा आणि सून प्रॉपर्टीवरील हक्क सोड म्हणून आईकडे तगादा लावत होते. पण आई काही हक्क सोडायला तयार नाही, हे पाहून मुलानं शेवटी आईला धमकावण्यास सुरुवात केली. एक दिवस दारु पिऊन येत मुलानं आपल्या आईला जबरदस्ती कागदपत्रांवर सही करण्यासाठी दबाव टाकला होता. पतीच्या मृत्यूनंतर मुलाचं आणि सुनेचं बदललेलं वागणं आईच्या लक्षात आलं. अनेक वर्ष आईने सहन केलं. पण अखेर वैतागून या महिलेला कोर्टाची पायरी चढावी लागली. दरम्यान, कोर्टाने या महिलेला दिलासा दिलाय.
बहिणीला प्रॉपर्टीत हिस्सा दिला नाही, म्हणून तिने आईला कोर्टात जाण्यासाठी प्रोत्साहित केलं, असा आरोप या वृद्ध महिलेच्या मुलाने केला होता. पण कोर्टाने मुलाच्या या युक्तिादालाही फेटाळून लावलं. आता दोन महिन्यांच्या आत मुलाला आणि त्याच्या बायकोला घर खाली करुन आईला ते द्यावं लागेल, असे निर्देश सत्र न्यायालयाने याप्रकरणी दिलेत. तसंच यापुढेच आईचा प्रॉपर्टीसाठी छळ केल्याचं निदर्शनास आलं तर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही कोर्टानं आपलाही निर्णयातून दिलाय.