Mumbai : बाईकची बॅटरी घरात चार्ज करताना अख्खा संसार डिस्चार्ज्ड! e-Bike वापरणाऱ्यांनो, सावधान
एक ठिणगी आणि अख्खा इमारतीत अग्नितांडव! तुमच्या सोसायटीतही ई-बाईक? मग हे वाचायलाच हवं!
मुंबई : सध्या ई-बाईकचा (e-bike News) वापर वाढलाय. वाढत्या वापरासोबत ई-बाईक पेट घेण्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. आता तर ई-बाईकची बॅटरी चार्ज करताना पेटली असल्याची घटना समोर आलीय. ही घटना मुंबईच्या भायखळा (Byculla Fire News) इथं घडली. यात ई-बाईकची बॅटरी (e-bike battery) तर जळून खाक झालीच, पण अख्ख घरही आगीने कवेत घेतलं. घरातील ही आग बघता बघता संपूर्ण इमारतीत पसरली होती.
शुक्रवारी भायखळ्याजवळील माझगाव इथं ई-बाईकची बॅटरी एका व्यक्तीने घरात चार्ज करण्यासाठी आणली. बॅटरी चार्ज करताना एक ठिणगी उडाली आणि अचानक बॅटरीने पेट घेतला. बघता बघता बॅटरी जळून खाक झाली. पण आग इतकी वेगाने पसरली की घरातही अग्नितांडव झाल्याने खळबळ उडाली.
अखेर घरातल्यांसह आजूबाजूच्यांनी प्रसंगावधान राखलं. बॅटरीला आग लागल्याचं पाहून घरातील पाचही जणांनी घराबाहेर धाव घेतली. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही घडना घडली.
एका दुमजली इमारतीच्या घरात ई-बाईकची बॅटरी चार्ज करताना पेटली होती . इमारतीच्या पहिल्या मजल्यावर घरात घडलेल्या या घटनेनंतर तातडीने या मजल्यावरील 10 लोकांना इमारतीच्या खाली उतरवण्यात आलं. वृद्ध माणसं आणि अस्थमाचा त्रास असलेल्यांना सुरक्षेखातर तातडीने खाली आणण्यात आलं होतं. आगीमुळे संपूर्ण मजल्यावर धूर झाला होता.
A #fire errupted today afternoon in a residential premises of #Mazgaon after a #bike battery placed on charging suddenly https://t.co/b67F7GYDL4 person has been injured in the incident but the entire house has been completely damaged.The owner was using the bike for past 6 months pic.twitter.com/l4Fso7QXBC
— Shyamsundar Pal (@ShyamasundarPal) October 28, 2022
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग भडकली असावी, अशी शंका व्यक्त करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे घरात ई-बाईकची बॅटरी चार्ज करणं धोकादायक ठरु शकतं, हेही अधोरेखित झालंय.
23 सप्टेंबर रोजी वसईत ई-बाईकच्या बॅटरीचा स्फोट झाला होता. बॅटरी चार्ज करताना झालेल्या स्फोटात 7 वर्षांच्या चिमुकल्याचा जीव गेला होता. त्यानंतर आता महिन्याभराने पुन्हा ई-बाईकच्या बॅटरीला चार्ज करताना घडलेली घटना अनेक सवाल उपस्थित करतेय.
ई-बाईकची बॅटरी घरातील इलेक्ट्रीक सॉकेटमध्ये शक्यतो चार्ज करु नये, असं आवाहन आता जाणकारांनी केलं आहे. तसंच ई बाईक घरात किंवा इमारतीच्या फ्लॅटमध्ये आत घेऊन जाऊ नये, असंही सांगितलं जातंय.
ई-बाईकची बॅटरी चार्ज करण्यासाठीची एक नियमावली जारी केली जाते. या नियमावलीचं कटाक्षाने पालन करणं गरजेचं असल्याचं या निमित्ताने अधोरेखित झालंय. अन्यथा बेजबाबदारपणामुळे मोठा अनर्थ ई-बाईकची बॅटरी चार्ज करताना घडू शकतो, अशी भीती व्यक्त केली जातेय.