मागेही सीटबेल्ट हवाच! पहिल्या दिवशी किती जणांवर कारवाई? आकडेवारी समोर
मुंबईकरांनो, मागच्या सीटवर बसला तर सीटबेल्ट लावायला विसरु नका! पोलीसांची बारीक नजर, कारवाईचा आकडा तर बघा...
मुंबई : कारमध्ये आता मागच्या सीटवर बसणाऱ्या प्रवाशांनाही सीटबेल्ट (Rear Seat Belt) लावणं बंधनकारक करण्यात आलंय. त्यामुळे मागे बसणाऱ्या प्रवाशांवरही वाहतूक पोलिसांची (Traffic Police) बारीक नजर असणार आहे. 1 नोव्हेंबरपासून या नियमाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. काल या कारवाईचा पहिला दिवस होता. पहिल्या दिवशी नेमकी किती जणांवर कारवाई (Mumbai Crime News) करण्यात आली, याची आकडेवारीही आता समोर आलीय. तब्बल 200 पेक्षा जास्त जणांना पोलिसांनी मागच्या सीटवर बसून सीटबेल्ट न लावल्याप्रकरणी दंड ठोठावला, अशी माहिती समोर आली आहे.
वाहतूक पोलिसांनी 1 नोव्हेंबरपासून कारमधील सगळ्यांनाच सीट बेल्ट बंधनकारक केलाय. मागे बसलेल्या प्रवाशांनी सीट बेल्ट लावला नाही, तर चलान कापलं जाणार आहे. सीट बेल्ट लावला नसेल तर 200 रुपयांचं दंड वसूल केला जाईल.
हा नियम लागू केल्याच्या पहिल्याच दिवशी दक्षिण आणि मध्य मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. एकूण 204 जणांना दंड ठोठवण्यात आला.
त्यातील सर्वाधिक दंड हा वरळी वाहतूक विभागाने वसून केल्याचं पाहायला मिळालंय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दादर आणि एमआरए मार्ग वाहतूक पोलिसाांच्या हद्दीत एकालाही दंड ठोठवण्यात आलेली नाही.
मुंबईमध्ये टॅक्सीने प्रवास करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. मात्र सर्वच टॅक्सीमध्ये मागच्या बाजूला सीटबेल्ट नाहीत. त्यामुळे टॅक्सी चालकांना मागच्या बाजूला सीट बेल्टची सुविधा बसवून घेण्यासाठी काही वेळ दिला जावा, अशी मागणी टॅक्सी संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.
टॅक्सी संघटनेनंही मागे बसणाऱ्या प्रवाशांना सीटबे्ल्ट लावणं बंधनकारक केल्याच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. पण 10 दिवसांत सगळ्या टॅक्सीमध्ये सीट बेल्ट बसवून घेणं अशक्य असल्याचं त्यांचं म्हणणंय. त्यामुळे पुढचे काही दिवस टॅक्सी चालकांना सीट बेल्ट बसवून घेण्यासाठी मुदत मिळावी, अशी त्यांची मागणी आहे.
दरम्यान, काही टॅक्सीमधील मागे बसणारे प्रवासी सीट बेल्ट लावण्यास टाळाटाळ करतात असा आरोपही कऱण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची गरज व्यक्त केली जााते आहे. तसे निर्देशही वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहेत.
मुंबईत दुचाकीवर मागे बसणाऱ्याही जसं हेल्मेट बंधनकारक आहे, त्याचप्रमाणे मागे बसणाऱ्या कारमधील प्रवाशांना सीटबेल्टही बंधनकारक असल्याबाबत जनजागृती करावी, असं आवाहन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी इतर कर्मचारी वर्गाला केलंय.