नवी मुंबई : वाशी येथे पाम बीच रोडवर भीषण अपघात घडला. भरधाव सीलॅरिओ कारला वळणावर वेग नियंत्रित करता न आल्यानं दुर्घटना घडली. या अपघातात तिघे जण जखमी झाले आहेत. भरधाव सीलॅरिओ कार आधी इनोव्हा कारला धडकली आणि त्यानंतर कार रस्त्यावर उलटली देखील. या अपघातात दोन्ही कारचं मोठं नुकसान झालं आहे. सीलॅरिओ कारने दिलेल्या धडकेमुळे इनोव्हा कार थेट नाल्यात पडली. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवतहानी झाली. पण तीन जखमींपैकी दोघांना गंभीर मार लागलाय.
सिलॅरिओ कार वेगात वळण घेण्याच्या प्रयत्नात होती. त्यावेळी वेगावर योग्य नियंत्रण ठेवलं न गेल्यानं अपघात घडला. सिलॅरिओ कारमध्ये असलेल्या दोघांनाही या अपघातामुळे गंभीर मार लागला. तर आणखी एक जण जखमी झाला आहे. तिघा जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य केलं. अपघातग्रस्त सिलॅरिओ कार रस्त्यावर पटली झाली होती. या कारचं अपघातात मोठं नुकसान झालं. कारचा दरवाजा, बोनेट, समोरची काच यांना अपघातात फटका बसला. पोलिसांनी ही कार रस्त्यावरुन बाजूला करत वाहतूक कोंडी टाळण्याचा प्रयत्न केला. या अपघाताची नोंद घेण्यात आली असून आता पोलिसांकडून पुढील कार्यवाही केली जातेय.
पाम बीच रोड येथे अनेकदा भरधाव वेगामुळे अपघात झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आता पुन्हा एकदा घडलेल्या अपघातामुळे पाम बीच मार्गावर जीवघेणा ठरत असल्याचं अधोरेखित झालंय. रस्ता मोकळा असल्याचं पाहून अनेकदा पाम बीच मार्गावरुन बेदरकारपणे वाहनं चालवली जात असल्याचं पाहायला मिळालं.
अनेकांनी पाम बीच रोडवर झालेल्या अपघातात जीव गमावलेला आहे. पण त्यानंतरही पाम बीच मार्गावरुन वाहन चालवणाऱ्यांना म्हणावी तशी शिस्त लागल्याचं पाहायला मिळत नसल्यानं चिंताही व्यक्त केली जाते आहे. वेगावर मर्यादा ठेवणं, लेन कटिंग न करणं, ओव्हरटेक करताना काळजी घेणं, हे प्रकार पाळले जात नसल्यानं वारंवार पाम बीच रोडवर अपघाताच्या घटना घडत असल्याचं अधोरेखित झालंय.