Navi Mumbai : अभ्यास केला नाही म्हणून शिक्षिकेने मुलाला दिले चटके!
होमवर्क केला नाही म्हणून शिक्षिकेने घरातली इलेक्ट्रीक लायटर काढला आणि...
नवी मुंबई : अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षा करण्याचा अधिकार शिक्षिकांना आहेच. पण शिक्षा नेमकी काय करायची, याचं तारतम्यही बाळगण्याची गरज व्यक्त होते आहे. अनेकदा खरंतर शिक्षकांनी आता विद्यार्थ्यांना मारण्याचीही सोय उरली नाही, असा आरोप केला जातो. तर दुसरीकडे काही शिक्षक हे अजूनही मुलांसोबत अमानवी पद्धतीची वागत असल्याचं दिसून येतं. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अभ्यास केला नाही म्हणून शिक्षिकेनं विद्यार्थ्याला चक्क चटके दिले आहेत. याप्रकरणी पोलिसांतही तक्रार दाखल करण्यात आली आहे. नवी मुंबईच्या वाशी इथं एका खासगी क्लासमध्ये घडलेल्या या प्रकाराने पालकांनीही संताप व्यक्त केलाय.
वाशीमधी एका खासगी क्लासमध्ये शिक्षिकेनं आठ वर्षांच्या मुलाला होमवर्क दिला होता. घरी दिलेला अभ्यास पूर्ण केला नाही म्हणून इलेक्ट्रिक लायटरने चटके दिले. वाशी येथील सेक्टर 3 मधील एका इमारतीत घेतल्या जाणाऱ्या खासगी क्लासमध्ये ही घटना घडली.
8 वर्षांचा मुलगा गेल्या काही दिवसांपासून खासगी क्लासमध्ये जात होता. दोन दिवसांपूर्वी संध्याकाळी तो क्लासमध्ये गेला असता त्याला शिक्षकाने गृहपाठ केला की नाही म्हणून विचारणा केली. पण त्याने केला नसल्याचं सांगितल्यानं शिक्षिकेनं धक्कादायक कृत्य केलं.
या शिक्षिकेने घरात वापरला जाणारा इलेक्ट्रीक लायटर घेऊन या मुलाच्या हातावर चटके दिले. हा संपूर्ण प्रकार मुलगा घरी आल्यावर त्याच्या पालकांना लक्षात आला. त्यानंतर या मुलाच्या पालकांनी वाशी पोलीस ठाणं गाठलं आणि संबंधिकत शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली.
पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशी पोलिसांनी संबंधित महिला शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या शिक्षिकेनं अजून कोणत्या विद्यार्थ्यासोबत असं कृत्य केलं आहे की नाही, याचाही तपास आता पोलिसांकडून केला जातोय. या प्रकारामुळे खासगी शाळेतील शिक्षिकांची विद्यार्थ्यांसोबत असलेली वागणूक नेमकी कशी आहे, असा सवालही पालकांकडून उपस्थित केला जातोय.