ईडीची कारवाई, सीआयडीची हाताची घडी, कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांना पैशांची प्रतीक्षा
पनवेल संघर्ष समितीने ईडी आणि सीआयडीकडे घोटाळा प्रकरणी कारवाई करण्याची समांतर पद्धतीने दोन्ही संस्थांना विनंती केली होती. परंतु ईडीने कारवाईचे हत्यार उपसले, तरी सीआयडी राजकीय दबावापोटी तोंडाला कुलूप लावून असल्याचा आरोप केला जात आहे
नवी मुंबई : कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या 543 कोटीच्या आर्थिक घोटाळा प्रकरणी सक्त संचनालयाने (ईडी) नवी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल झालेल्या गुन्ह्यावरून विवेकानंद पाटील यांना अटक केली. त्यांची 234 कोटीची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली. परंतु गेल्या वर्षभरात सीआयडीकडे गुन्हा वर्ग करण्यात आल्यापासून त्यांनी हाताची घडी बांधल्याने राज्य पोलिसांची प्रतिमा मलीन होत असल्याची चर्चा खातेदारांमध्ये पसरली आहे. यात महाविकास आघाडीकडे संशयाने पाहिले जात आहे.
पनवेल संघर्ष समितीने ईडी आणि सीआयडीकडे घोटाळा प्रकरणी कारवाई करण्याची समांतर पद्धतीने दोन्ही संस्थांना विनंती केली होती. परंतु ईडीने कारवाईचे हत्यार उपसले, तरी सीआयडी राजकीय दबावापोटी तोंडाला कुलूप लावून असल्याचा आरोप करून 76 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल असताना अद्याप कुणावरही अटकेची कारवाई का केली गेली नाही, असा प्रश्न पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी उपस्थित केला आहे.
दुसरीकडे, रिझर्व्ह बँकेने कर्नाळा बँकेचा व्यवसाय परवाना रद्द केला आहे. परंतु ठेवीदारांना त्यांचे पैसे कधी परत मिळतील, हा प्रश्न सतावत आहे. काहींनी नोकरीतील निवृत्तीनंतर आलेली भविष्य निर्वाह निधीतील पुंजी बँकेत मोठ्या विश्वासाने ठेवली होती. जमिनीचे आलेले पैसे मुलांच्या शिक्षणासह विवाहाकरीता काहींनी गुंतवले होते. काहींनी एक टक्का ज्यादा व्याज मिळतो, म्हणून पैसे ठेवले होते. परंतु विवेकानंद पाटील आणि सहकाऱ्यांनी विश्वासघात केल्याने बँक बुडाली.
ठेवीदारांचा भडका
त्यातच नेमका कोरोनाचा कहर आला. आर्थिक मंदी पसरली. याच काळात अनेक ठेवीदारांना पैशाअभावी तणावग्रस्त जीवन जगावे लागले. काहींना उसनवारी करून टाहो फोडत हृदयविकाराची शस्त्रक्रिया करावी लागली. काहींच्या घरची मंगलकार्य रखडली. काहींना आर्थिक दारिद्रयाच्या खाईत जीवन जगावे लागले आहे. तर काही जण तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करत दिवस ढकलत आहेत. आपले पैसे असून दुसऱ्यांकडे पैशासाठी याचना करावी लागत आहे. मात्र त्यांना अद्याप न्याय मिळत नाही. जो तो राजकारण करून त्यांच्या भावनिक मुद्द्यावर श्रेयाच्या रेघोट्या ओढत आहेत. पण पैसे कधी देणार या प्रश्नाचे आणि इतर आरोपींना अटक कधी होणार याचे उत्तर देत नाहीत. त्यामुळे ठेवीदार वैतागले आहेत.
ठेवीदारांसाठी पनवेल संघर्ष समितीने कंबर कसली आहे, हे वारंवार सिद्ध झाले आहे. समितीने पुढाकार घेतला नसता तर विवेकानंद पाटलांना अटक आणि त्यांच्या मालमत्तेची जप्ती झालीच नसती. शिवाय बँकेचा परवाना रद्दही झाला नसता. समोर पेण बँकेचे उत्तम उदाहरण आहे. मात्र सहकार कायदा, पोलिस कायद्याच्या अनुषंगाने पूर्ण रणनीती आखून आम्ही प्रयास करत आहोत. त्यामुळे ठेवीदारांना येत्या तीन महिन्याच्या आत त्यांच्या इतर बँक खात्यात पैसे जमा होतील. त्यासाठी लागणारी केवायसी माहिती ठेवीदारांनी बँकेत द्यावी. पुढचा प्रस्ताव व ऑडिट प्रक्रिया पूर्ण करून घेण्यास आम्ही सक्षम आहोत. त्यामुळे पाच लाखापर्यंत आणि त्यापुढील ठेवीदारांना त्यांचे पैसे नक्की परत मिळवून देऊ – कांतीलाल कडू, अध्यक्ष, पनवेल संघर्ष समिती
ठेवीदारांचं म्हणणं काय
1) ईडी एवढ्या कोट्यवधी रुपयांची जप्ती करत आहे. पण महाराष्ट्र सरकार याकडे कानाडोळा का करत आहे ? आमच्या आईने एक- एक रुपया जमवून पुढील भविष्यासाठी पैसे ठेवले होते. आम्हाला लवकरात लवकर पैसे मिळावे हीच विनंती करतो. – सचिन पाटील, ठेवीदार – खारघर
2) आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत एकटेच राहतो. माझ्या पतीने आजवर कमावलेली सर्व रक्कम विश्वासाने आम्ही बँकेत टाकली. मात्र आमचा विश्वासघात झाला. उद्धव ठाकरे सरकार विवेक पाटील यांना पाठीशी घालत आहे. सर्व पैसे आमचे अडकून पडले आहे काय खायचे हा प्रश्न आमच्या समोर आहे. – रत्ना बडगुजर, ठेवीदार – पनवेल
3) ईडीने कारवाई केली आम्हाला आशेचे किरण दिसत आहेत. आम्ही 2 वर्ष वाट पाहत आहोत. मात्र महाविकास आघाडी सरकार यावर काय भूमिका घेते बघायचं आहे. – समीर भगत, ठेवीदार – कामोठे
संबंधित बातम्या :
कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीकडून अटक
महाराष्ट्रातील ‘या’ सहकारी बँकेत तुमचं खातं आहे का? रिझर्व्ह बँकेकडून परवाना रद्द