मुंबई : गुजरात आणि मुंबईत एनसीबीने मोठी कारवाई केली आहे. गुजरातमधील जामनगर आणि मुंबईतील गोदामात छापेमारी (NCB Raid Godown) करत एनसीबीने करोडो रुपयांचे मेफोड्रेन ड्रग्ज जप्त (MD Drugs Seized) केले आहे. जप्त केलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 120 कोटी रुपये इतकी आहे. या कारवाईत एनसीबीने एअर इंडियाच्या माजी पायलटसह सहा जणांना अटक (Six Arrest including Air India EX Pilot) केली असून, सर्व आरोपींची चौकशी सुरु आहे.
मुंबई आणि गुजरातमधील गोदामात मेफोड्रेन ड्रग्ज ठेवण्यात आले असल्याची गुप्त माहिती एनसीबीला मिळाली होती. या माहितीनुसार, एनसीबीने सदर गोदामांवर छापा टाकला. या छापेमारीत 50 किलो मेफोड्रेन ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.
एनसीबीने अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यापैकी दोन आरोपींना गुजरातमधील जामनगर येथून अटक करण्यात आली आहे. या टोळीच्या म्होरक्याला याआधीही मेफोड्रेन ड्रग्जच्या तस्करी प्रकरणी अटक झाली होती.
विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एअर इंडियाच्या माजी पायलटचाही समावेश आहे. सोहेल गफ्फार असे या पायलटचे नाव असून, तो 2016 ते 2018 दरम्यान एअर इंडियामध्ये पायलट होता, अशी माहिती एनसीबीचे डेप्युटी जनरल एसके सिंग यांनी दिली.
गुरुवारी डीआरआयने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई करत 16 किलो हेरॉईन जप्त केले. एका ट्ऱॉली बॅगेत हे हेरॉईन लपवण्यात आले होते. या जप्त केलेल्या हेरॉईनची किंमत 80 कोटी रुपये आहे. याप्रकरणी एका आरोपीलाही अटक करण्यात आली आहे.