काळीज पिळवटून टाकणारी घटना अतिदुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोखाडा (Mokhada News) येथून समोर आली आहे. एका गर्भवती महिलेची प्रसूती झाली. घरातच प्रसूती झालेल्या या महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला. पण दुर्दैवानं या नवजात जुळ्या बाळांचा (New born twins) पहिलाच श्वास अखेरचा श्वास ठरला. प्रसूती झालेल्या महिलेच्या डोळ्यादेखत दोन्हीही निरागस नवजात लेकरांता तडफडून करुण अंत झालाय. धक्कादायक बाब म्हणजे प्रसूती झालेल्या महिलेला चक्क झोळीतून तीन किलोमीटर पायपीट करत उपचारासाठी न्यावं लागलंय. गावात आरोग्य सुविधा नसल्यामुळे ही घटना घडली. मोखाडा येथील बोटोशी (Botoshi) ग्रामपंचायतीमधील मरकटवाडी इथं घडलेली ही घटना उघडकीस आल्यानंतर हळहळ व्यक्त केली जातेय. शनिवारी खरंतर ही घटना घडली होती. यानंतर 48 तासांनी म्हणजेच स्वातंत्र्यदिनी प्रसूत महिलेची प्रकृती खालावली होती. त्यामुळे अखेर या महिलेला डोलीतून नेत स्थानिकांनी रुग्णालयात पोहोचवलं.
वंदना बुधर असं प्रसूती झालेल्या महिलेचं नाव आहे. या महिलेला शनिवारी प्रसुती कळा सुरु झाल्या. रुग्णालय गाठणं तेव्हा अशक्य होतं. त्यामुळे या महिलेची प्रसुती घरातच करण्याची वेळ ओढावली. घरामध्ये प्रसूत झालेल्या या महिलेच्या दोन्ही मुलांचा प्रसुतीदरम्यान, मृत्यू झाला. वेळीच जुळ्या मुलांना उपचार मिळू शकले नाहीत आणि त्यांनी आपल्या आईच्या डोळ्यांदेखतच प्राण सोडला. या घटनेनं वंदना बुधर खचल्या होत्या. प्रसुतीमुळे आधीच शारिरीक थकवा आणि त्यात मुलांचा डोळ्यांदेखत झालेल्या तडफडून मृत्यू, याने वंदना यांच्यावर मोठा आघात झाला.
शनिवारी 13 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. मध्ये एक दिवस निघून गेला. पण स्वातंत्र्यदिनी, म्हणजेच काल या महिलेच्या प्रकृतीत बिघाड झाला. प्रकृती खालावत असल्याकारणाने या महिलेला रुग्णालयात दाखल करणं भाग होतं. अखेर गावातीलच इतर लोकांनी या प्रसूत महिलेला एका डोलीमध्ये बसवलं आणि मुख्य रस्ता गाठला. तिथून नंतर एका खासगी वाहनाने या महिलेला दवाखान्यात दाखल करण्यात आलं. सध्या या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, बोटोशी ग्रामपंचायत हद्दीमध्ये आणखी एका गर्भवती महिलेलाही डोली करुन खोडाळा प्राथमिका आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी आणण्यात आलं होतं. रस्ता नसल्यामुळे डोली करुन रुग्णांना दवाखान्यात आणण्याच्या पाच घटना याआधीही समोर आल्याचं सांगितलं जातंय.