कवी वरवरा राव यांना हैदराबादला जाण्यास परवानगी नाही; एनआयए कोर्टाने याचिका धुडकावली
राव यांनी मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आणि त्यानंतर डोळ्यांची पुरेशी काळजी घेण्यासाठी तीन महिने हैदराबादला जाण्यास परवानगी द्या, अशी विनंती याचिकेतून केली होती.
मुंबई : भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी, तेलगू कवी वरवरा राव (Varvara Rao) यांची याचिका आज राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने फेटाळून लावली. त्यांच्या दोन्ही डोळ्यांमध्ये मोतीबिंदू आहे. त्यावर शस्त्रक्रिया (Surgery) करण्यासाठी हैदराबादला जाणे आवश्यक आहे. त्यासाठी परवानगी (Permission) देण्याची विनंती त्यांनी केली होती. ही विनंती मान्य करण्यास विशेष न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी नकार दिला आहे.
सुप्रीम कोर्टाने गेल्या महिन्यात मंजूर केला होता जामीन
82 वर्षीय राव यांनी गेल्या महिन्यात जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. न्यायालयाने त्यांचे वय आणि आजारपण लक्षात घेऊन अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यावेळी न्यायालयाने त्यांना मुंबईबाहेर न जाण्याचे निर्देश दिले होते.
याचदरम्यान त्यांच्या डोळ्यांच्या त्रासावर शस्त्रक्रिया गरजेची झाली आहे. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी हैदराबादला जाण्यास त्यांनी परवानगी मागितली होती. मात्र अशी परवानगी देण्यास विशेष न्यायालयाने नकार दिला.
याचिकेत मांडले होते हे म्हणणे
राव यांनी मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आणि त्यानंतर डोळ्यांची पुरेशी काळजी घेण्यासाठी तीन महिने हैदराबादला जाण्यास परवानगी द्या, अशी विनंती याचिकेतून केली होती. त्यांच्या या याचिकेवर सरकारी पक्षाने तीव्र आक्षेप घेतला आणि आरोपी राव यांना मुंबईबाहेर जाण्यास परवानगी न देण्याचा युक्तिवाद केला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर विशेष न्यायाधीश रोकडे यांनी राव यांची याचिका फेटाळली.
राव यांना चार वर्षांपूर्वी केली होती अटक
एल्गार परिषद आणि माओवादी संबंधाच्या संशयावरून राव यांना चार वर्षांपूर्वी अटक केली होती. एनआयएने 28 ऑगस्ट 2018 रोजी हैदराबाद येथील निवासस्थानातून त्यांना अटक केली होती.
या कारवाईनंतर त्यांनी जामिनासाठी वेळोवेळी दाद मागितली. त्यांचा हा लढा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. त्यानंतर न्यायालयाने वैद्यकीय कारणास्तव त्यांची जामिनावर सुटका केली आहे.
31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेच्या कॉन्क्लेव्हमध्ये कथित प्रक्षोभक भाषणे केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि पुढील कारवाई केली आहे.
आणखी एका आरोपीची कोर्टात धाव
या प्रकरणातील आणखी एक आरोपी महेश राऊतनेसुद्धा वैद्यकीय उपचाराचे कारण देत न्यायालयात दाद मागितली आहे. न्यायाधीश रोकडे यांनी त्याच्या अर्जाची दखल घेतली आणि त्याला वैद्यकीय मदत देण्याचे तसेच गरज भासल्यास अधिक उपचारासाठी सरकारी रुग्णालयात पाठविण्याचे निर्देश कारागृह अधिक्षकांना दिले आहेत.