इन्स्टाग्रामवर जाहिरात बघून सुट्टीसाठी लोणावळ्यातील बंगला बुक करताय? थांबा ! डोळ्यात अंजन घालणारी घटना
महाराष्ट्रामध्येच नव्हे तर लोणावळा हे हिलस्टेशन म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. पावसाळा आला की पर्यटकांची पिकनिकला जाण्यास सुरुवात होते (Online Fraud through Instagram advertisement cheats by asking to rent bungalows for holidays in Lonavala).
मुंबई : महाराष्ट्रामध्येच नव्हे तर लोणावळा हे हिलस्टेशन म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. पावसाळा आला की पर्यटकांची पिकनिकला जाण्यास सुरुवात होते. पर्यटक हे काही विशिष्ट ठिकाणांना जास्त पसंती देतात. त्यामध्ये एक महत्वाचं स्थान लोणावळा सुद्धा आहे. याच गोष्टीचा फायदा घेऊन एक टोळी लोणावळ्यातील बंगल्याचे फोटो शेअर करत काही नागरिकांना लुबाडण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी संबंधित टोळीतील दोन तरुणांना बेड्या ठोकल्या आहेत. अविनाश रूपकुमार जाधवानी (वय 26) आणि आकाश रूपकुमार जाधवानी (वय 22) अशी आरोपींची नावे आहेत (Online Fraud through Instagram advertisement cheats by asking to rent bungalows for holidays in Lonavala).
नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील एका कुटुंबाने 24 जून ते 27 जून 2021 दरम्यान लोणावळ्यात सुट्टी घालवण्याचे नियोजित केले होते. त्यांनी इन्स्टाग्रामवर lonavala_villa77 या अकाउंटवर बंगला भाड्याने मिळेल, अशी जाहिरात बघितली होती. त्याच जाहिरातीच्या आधारावर त्यांनी दिलेल्या नंबरवर आरोपींना संपर्क साधला. त्यानंतर आरोपींनी 9529971404 या नंबरवर व्हाट्सअॅप चॅटिंगद्वारे रिप्लाय दिला (Online Fraud through Instagram advertisement cheats by asking to rent bungalows for holidays in Lonavala).
समोरील व्यक्तीने फिर्यादीस बंगल्याचे फोटो पाठवले. फिर्यादीने भाडे विचारले असता त्याने एका रात्रीसाठी नाश्ता आणि जेवणासह 28 हजार रुपये भाडे लागेल, असे सांगितले. तसेच बंगला क्रमांक 33-34, कुणे व्हिलेज, खंडाळा, लोणावळा असा बंगल्याचा पत्ता सांगितला. त्यानंतर समोरील व्यक्तीच्या सांगण्यावरुन तक्रारदार यांनी आरबीएल बँकेचे खाते क्रमांक 309013336219 वर IMPS ने 30 हजार रुपये आणि एसबीआय बँकेचे खाते क्रमांक 20316173741 या खात्यावर 20 हजार रुपये इतकी रक्कम भरली आणि पाठवली. आरोपींनी त्यांना lonavalavillas77@gmail.com या ईमेल आयडीवरून रिसीट पाठवली. पुढील पाठपुरावा करण्याकरता नमूद व्हाट्सअॅप धारकाने 9156168118 आणि 8390864676 हे मोबाईल नंबर दिले.
आरोपींनी सांगितलं बंगला मिळणार नाही
आरोपींनी 24 जूनला तक्रारदारांना व्हाट्सअॅपवर मेसेज पाठवला. यामध्ये त्यांनी बुकिंग केलेल्या बंगल्यामध्ये इलेक्ट्रिसिटी स्फोट झाल्याचं सांगितलं. तसेच या स्फोटात बंगल्यातील एसी, टीव्ही, फ्रीज हे डॅमेज झाले असल्याने येऊ नका, असं सांगितलं. त्यामुळे तक्रारदारांनी त्यांचे पैसे परत मागण्या करता दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधला असता आरोपींनी फोन उचलणे बंद केले. त्यानंतर तक्रारदारांनी व्हाट्सअॅपवर संपर्क साधला असता त्यांना कोणताही रिप्लाय मिळाला नाही.
यानंतर तक्रारदारांनी लोणावळा येथील त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीला बंगल्याच्या पत्त्यावर जाऊन चौकशी करण्यास सांगितले. यावेळी त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण इंस्टाग्रामवरील जाहिरातीमधील पत्ता चुकीचा असल्याचं उघड झालं. आरोपींनी जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर lonavala_villas77@ या नावाने कोणताही बंगला नव्हताच . आपली फसवणूक झाली असं उघड झाल्यानंतर तक्रारदारांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
तांत्रिक तपासाने लागला आरोपींचा शोध
पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींचे मोबाईल नंबरचे लोकेशन प्राप्त केले. आरोपींचे लोकेशन हे पुण्यातील कल्याणी नगर, वडगाव शेरी परिसरात असल्याची माहिती समोर आली. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची टीम पुणे शहर येथे गेली आणि आरोपींचे मोबाईल क्रमांक, इंस्टाग्राम आयडी आणि बँक खात्याची माहिती प्राप्त केली. त्यानंतर पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे अविनाश रूपकुमार जाधवानी आणि आकाश रूपकुमार जाधवानी या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपींची चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे उघड झाले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करुन मलबार हिल पोलीस ठाण्यात आणलं.
फसवणुकीसाठी सोशल मीडियाचा वापर
पोलिसांनी जेव्हा पुढील तपास केला तेव्हा तपासात उघडकीस आलं कि ह्या आरोपींवर मलबार हिल पोलीस, डी बी मार्ग पोलीस ठाणे, दादर पोलीस ठाणे, ठाणे नगर पोलीस ठाणे आणि मुंलुड पोलीस ठाण्यात या प्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत. या आरोपींनी ह्या गुन्ह्यात स्टेट बँक, कोटक महिंद्रा बँक, आरबीएल बँक, स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक आणि एचडीएफसी बँकेच्या विविध खात्या सोबतच चार मोबाईल नंबरचाही वापर केला होता. एवढंच नव्हे तर बोगस इंस्टाग्राम अकाउंट – lonavala_villa77 आणि Emaili ID – lonavalavillas77@gmail.com चा देखील वापर केला होता.
पोलिसांचं आव्हान
विशेष म्हणजे फक्त मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्राच्या अनेक भागात ह्या आरोपींनी अनेक गुन्हे केले आहेत. त्यांच्या विरोधात अनेक ठिकाणी तक्रारी दाखल आहेत. त्यामुळे जर ह्या आरोपींनी कोणाला फसविले असेल तर किंवा आरोपींसंदर्भात अथवा गुन्ह्या विषयी काही माहिती हवी असल्यास सपोनि डिगे यांस मो. क्र. ९५९४१४६६९९ / ८१६९४८७६४६ वर संपर्क करण्यात यावा, असं आव्हान मलबार हिल पोलीस तर्फे करण्यात आलं आहे. त्याचबरोबर नागरिकांनी ऑनलाईन आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी पूर्णपणे खातरजमा करावी, असंही आवाहन पोलिसांनी केलं आहे.
हेही वाचा :