VIDEO : पब्लिक मार, ICICI बँकेत दरोडा, पळून जाणाऱ्या नराधमाला पकडला, लोकांनी लाथा-बुक्क्यांनी तुडवला
विरार पूर्वेत ICICI बँकेत हत्या करुन लूट करणारा आरोपी अनिल दुबे याला नागरिकांनी बेदम चोप दिल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
विरार (पालघर) : विरार पूर्वेत ICICI बँकेत हत्या करुन लूट करणारा आरोपी अनिल दुबे याला नागरिकांनी बेदम चोप दिल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आरोपी अनिल दुबे याने 29 जुलैला विरारच्या ICICI बँकेत असिस्टंट मॅनेजर योगिता वर्तक-चौधरी आणि कॅशियर श्रद्धा देवरुखकर यांच्यावर धारदार हत्याराने प्राणघातक हल्ला केला होता. त्यानंतर त्याने बँकेतील सोने, रोख रक्कम घेऊन फरार होण्याचा प्रयत्न केला. पण नागरिकांनी त्याला पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले होते.
आरोपीला पब्लिक मार
संबंधित घटनेच्या दिवशी अनिल दुबे याचे क्रूरकृत्य पाहून नागरिक एवढे संतप्त झाले होते की, बघणारा प्रत्येकजण फक्त मारा, हातपाय बांधा एवढेच वाक्य बोलत होता. या प्रकरणाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आरोपी सध्या अनिल दुबे हा विरार पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्यावर हत्या, प्राणघातक हल्ला, लूट असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आला आहे. तो सध्या पोलीस कोठडीत आहे.
संबंधित घटनेचा व्हिडीओ बघा :
VIDEO : पब्लिक मार, ICICI बँकेत दरोडा, पळून जाणाऱ्या नराधमाला पकडला, लोकांनी लाथा-बुक्क्यांनी तुडवला #Virar #Crime #ViralVideo pic.twitter.com/qXlgv50yfU
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 1, 2021
नेमकं काय घडलं?
गुरुवारी आठ वाजता आयसीआयसीआय बॅंकेच्या विरार पूर्वे शाखेत असिस्टंट मॅनेजर योगिता चौधरी-वर्तक आणि श्रद्धा देवरुखकर या दोघी उशीरा सायंकाळपर्यंत बॅंकेतच काम करत होत्या. बॅंकेचा माजी मॅनेजर अनिल दुबे याने ओळखीचा फायदा उचलत बॅंकेच्या आत प्रवेश केला. त्यानंतर त्याने चाकूने योगिताच्या गळ्यावर-चेहऱ्यावर वार केले.
घटनेचं गांभीर्य ओळखून श्रद्धा हिने बॅंकेची इमरजन्सी अलार्म बेल वाजवली. त्यामुळे बाहेरचे नागरीक सतर्क झाले. मात्र तोपर्यंत आरोपी अनिल दुबे याने श्रद्धावरही अनेक वार केले. त्यात ती देखील गंभीर जखमी झाली. जखमी अवस्थेत श्रद्धाने प्रतिकार केला. पण आरोपीसमोर तिची ताकद कमी पडल्याने त्याने बॅंकेतील 1 कोटी 38 लाखांचं सोनं आणि रोख रक्कम बॅगेत भरली. त्यानंतर तो बँकेबाहेर पडून फरार होण्यात यशस्वी झाला होता.
बँकेत सुरक्षा रक्षकच नाही
बँकेतील आरडाओरडा पाहून बाजूलाच असणाऱ्या काही जिगरबाज तरुणांनी आरोपीला बॅगेसह पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. संबंधित घटनेनंतर आज (30 जुलै) मीरा-भाईंदर, वसई-विरारचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनीही घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पण सुरक्षा रक्षक जर बँकेसमोर असते तर एवढी मोठी घटना घडली नसती. महिलेचा जीव गेला नसता. त्यामुळे बँकेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
मृतक महिलेच्या नातेवाईकांचे बँकेवर आरोप
दरम्यान, श्रध्दा आणि मृतक योगिताच्या कुटुंबियांनी रात्रीच्या सुमारास बॅंकेत सुरक्षारक्षक का नव्हता? असा प्रश्न विचारला आहे. तसेच जर सुरक्षारक्षक असता तर नक्कीच ही घटना घडली नसती, असं म्हणत यात बॅंकेचा निष्काळजीपणा असल्याचा आरोप महिलांच्या नातेवाईकांनी केला आहे. मृतक योगिताचे 5 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तिला 3 वर्षांचा एक मुलगा आहे. तर त्यांचा पती हे फार्मा कंपनीत काम करतात. जखमी श्रद्धा यांनाही 5 वर्षांचा मुलगा आहे.
आरोपी हा अॅक्सिस बँकेत मॅनेजर
आरोपी अनिल दुबे हा सध्या नायगांव येथे अॅक्सिस बॅंकेचा मॅनेजर आहे. आरोपी दुबे हा कर्जबाजारी झाला होता. तो आर्थिक अडचणीत होता. त्यामुळे हे टोकाचं पाऊल उचळल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. विरार पोलिसांनी आज वसई न्यायालयात अनिल दुबेला हजर केलं. वसई न्यायलयाने आरोपीला 6 ऑगस्ट पर्यंत 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.