सायरस मिस्त्री अपघाती मृत्यू प्रकरण, मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल; न्यायालयाने दिले ‘हे’ आदेश
सायरस मिस्त्री अपघात प्रकरणात पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासावर अनेक प्रश्न या याचिकेत उपस्थित करण्यात आले आहेत. पालघर येथील संदेश शिवाजी जेधे यांनी अॅड. सादिक अली यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे.
मुंबई : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे अपघाती मृत्यू प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले आहे. या प्रकरणात आरोपी असलेल्या डॉ. अनाहिता पंडोले यांच्याविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. वास्तविक सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका मंगळवारी उच्च न्यायालयात दाखल झाली. त्यावर जे काम दंडाधिकाऱ्यांचे आहे, त्यासाठी तुम्ही येथे कशाला आलात? असा सवाल न्यायालयाने याचिकाकर्त्याला केला. मात्र आपल्याकडे डॉ. पंडोले यांनी मद्यपान करून ड्रायव्हिंग केल्याचे पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेज आहे, असे याचिकाकर्त्याने सांगितले. न्यायालयाने ते पुरावे सादर करण्यासाठी वेळ देत सुनावणी 17 जानेवारीपर्यंत पुढे ढकलली.
सरकारी वकिलांनी आरोप फेटाळले
मुंबई हायकोर्टात दाखल याचिकेत गाडी चालवणाऱ्या अनाहिता पंडोले नशेत असल्याचा याचिकाकर्त्यांच्या वकिलांचा आरोप आहे. मात्र सरकारी वकिलांनी हे आरोप फेटाळलेत. तपास योग्य दिशेनं सुरू असल्याचा दावा सरकारी वकिलांनी आज सुनावणी दरम्यान केला.
सदर याचिकेवरील सुनावणी 17 जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. मात्र पुढील सुनावणीनंतर आम्ही आमची पुढची कायदेशीर भूमिका घेणार आहोत, असं याचिकाकर्ता यांचे वकील अॅड. सादिक अली यांनी सांगितले.
याचिका काय आहे ?
उद्योगपती सायरस मिस्त्री अपघात संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सायरस मिस्त्री अपघात प्रकरणात पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासावर अनेक प्रश्न या याचिकेत उपस्थित करण्यात आले आहेत.
पालघर पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या तपासावर याचिकर्त्याकडून अनेक आक्षेप घेण्यात आले आहेत. यात दाखल गुन्ह्यात कलम 304 देखील लावण्यात यावा अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. पालघर येथील संदेश शिवाजी जेधे यांनी अॅड. सादिक अली यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे.